चौसाळा: मानोरा तालुक्यातील भोयणी येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवून वारंवार पाठपुरावाही, तसेच प्रशासनाकडून दखलच घेण्यात येत नसल्याने आंदोलनाचाही इशाराही देण्यात आला. त्यानंतरही उपाय योजना न झाल्याने अखेर ३ एप्रिल रोजी गोरसेना धमरणी महिला संघटनेच्यावतीने कारंजा-मानोरा मार्गावर रास्तारोको करण्यात आला. त्यावेळी तहसीलदारांच्यावतीने नायब तहसीलदारांनी घटनास्थळी दाखल होत, येत्या दोन दिवसांत ही समस्या निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.
मानोरा तालुक्यातील भोयणी येथे गेल्या दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या संदर्भात ग्रामपंचायतने सभेत ठराव घेऊन टँकरने किंवा इतर उपाय करून गावात पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केला. त्यानंतरही महिनाभर त्या प्रस्तावाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मानोराच्या तहसीलदारांकडे २३ मार्च रोजी निवेदन सादर करून रास्तारोको करणार असल्याचा इशारा देण्यात आला. त्यावेळी तहसीलदारांनी ग्रामस्थांची समजूत काढून या ठिकाणी तातडीने टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे २८ मार्च रोजी करण्यात येणारे रास्तारोको आंदोलन स्थगित करण्यात आले; परंतु २ एप्रिलपर्यंतही यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर गोरसेना धरमणी महिला संघटनेच्या नेतृत्वात ३ एप्रिल रोजी कारंजा-मानोरा मार्गावर भोयणी फाट्यानजिक रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी गावातील जनतेसह गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार डॉ. सुनिल चव्हाण यांनी नायब तहसीलदार भोसले यांना घटनास्थळी पाठविले. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून येत्या दोन दिवसांत येथील पाणी समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण मळघणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रास्तारोको आंदोलनात गावातील वृद्ध महिला, पुरुषांसह युवकांनी सहभाग घेतला होता.