अकोला ते आर्णी या राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचे कंत्राट मानोरा तालुक्यातील हातना गावापासून दिग्रसदरम्यान आर.एन.एस. इन्फ्रा.कं. हुबळी यांना मिळालेले आहे .राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करीत असताना या महामार्गाच्या निर्मितीसाठी कंपनीचे असंख्य मालवाहू ट्रक दिवस-रात्र गौण खनिजाची वाहतूक करीत असतात. मानोरा-दिग्रसदरम्यान शासकीय वाहने आणि खासगी असंख्य वाहनांची वर्दळ दिवसभर चालू राहते. ज्यामुळे हातना ते दिग्रसदरम्यान प्रचंड मातीचे लोट प्रत्येक वाहनाच्या आवागमना दरम्यान निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात धुळीचे वादळ उठून गावांमध्ये उडत असल्याने मानोरा तालुक्यातील अनेक गावातील असंख्य नागरिकांना प्रचंड त्रास मागील अनेक महिन्यांपासून सोसावा लागत आहे. पर्यावरण मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग बांधकामापूर्वी ना-हरकत देताना नागरिकांचे आरोग्य राखण्यासाठी पर्यावरणपूरक अटी घातलेल्या आहेत. या अटींचे उल्लंघन कंत्राटदार कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, अमरावती आणि उपविभागीय अभियंता यवतमाळ यांचेद्वारा सुरू आहे. या उपद्रवामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने वेळीच या बेकायदेशीर कामास तात्काळ आळा घालण्यासाठी गैरअर्जदार कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याविरोधात आदेश पारित होणे आवश्यक आहे. तालुक्यातील सिंगडोह, साखरडोह, रोहना, कोलार, हळदा, आमगव्हाण, मानोरा, विठोली, बेलोरा, माहुली, हातना आणि सध्याच्या परिस्थितीत वाई गौळ येथील ग्रामस्थांना या मातीच्या लोटांचा सामना दररोज करावा लागत आहे.
धुळीच्या प्रचंड लोटाने गावकरी व वाहनधारक बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 6:10 AM