लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पावसाळ्याला आता कुठे सुरुवात झाली असतानाच वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार जिल्हाभरात घडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले असून, पाणी पुरवठा योजना ठप्प होणे, पीठ गिरण्या बंद पडण्यासह विविध व्यवसायांवर याचा परिणाम होत आहे. शिवाय अपघाताची भितीही निर्माण झाली आहे. महावितरणच्यातीने मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीच्या कामांत दिरंगाई केल्याने हा प्रकार घडत असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.जिल्ह्यात वादळी वाºयामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वारंवार घडत असून, खंडीत झालेला पुरवठा तीन ते चार दिवस सुरळीतही होत नाही. मानोरा शहरासह तालुक्यात गुरुवार ६ रोजी सायंकाळी विजेच्या कडकडासह वादळी वाºयाने हजेरी लावली त्यामध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊसही झाला. वादळी वाºयासह आलेल्या पावसाने मानोरा शहरासह तालुक्यातील काही गावांतील वीज पुरवळा खंडीत झाला. तो २२ तासापर्यंत सुरळीत झालाच नाही. मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी परिसरातील ६ गावे, तसेच मोहरी आणि शेलु परिसरातील काही गावांत रमजान ईदीच्या पूर्व संध्येला वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर तीन दिवस सुरळीत झाला नाही. रात्रंदिवस विजपुरवठा खंडीत राहत असल्यामुळे नागरिक उकाडयामुळे त्रस्त झाले आहेत. आबाल वृद्धांना त्याचा मोठा त्रास होत आहे. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांवर त्यामुळे प्रभाव पडून ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. पिठ गिरण्यासह इतर विजेवर चालणारे लघू व्यवसायही यामुळे अडचणीत येत आहेत. महावितरणकडून वीज तारा, वीज खांब दुरुस्तीसह इतर कामांना वेग देणे आवश्यक झाल्याचे मत ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. चार गावांत पाच दिवसानंतर वीज पुरवठा मालेगाव तालुक्यातील धारपिंप्री, डोंगरकिन्ही, पांगरीकुटे, वडप, रेगाव या गावांत दिनांक ५ जून रोजी दुपार पासून वीज पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे पाणी पुरवठा योजना प्रभावित झालीच शिवाय उकाड्यामुळ लहान मुले, वृद्धांचे मोठे हाल झाले. ग्रामस्थांनी महावितरणच्या अभियंत्यांशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला; परंतु बहुतांश अधिकाºयांशी संपर्क झाला नाही आणि ज्यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी काम सुरू असल्याचे सांगून वेळ मारून नेली. प्रत्यक्षात ५ जून रोजी खंडीत झालेला वीज पुरवठा ९ जून रोजी सकाळीच सुरळीत झाला. खंडीत वीज पुरवठ्याचा त्रास चिमुकल्यांना आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया शेंदुरजना आढावसह परिसरातील गावांत तीन दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजना प्रभावित झाली असून, शेंदुरजना ३३ केव्ही वीज उपकेंद्रांतर्गत शनिवार ९ जून रोजी सांयकाळपासून खंडीत झालेला वीज पुरवठा रविवारी वृत्त लिहिस्तोवरही पूर्ववत झाला नाही. एकाएकी खंडीत होणाºया वीज पुरवठ्यामुळे काही घरांतील वीज उपकरणे निकामी झाली, तर पाणी पुरवठा योजना ठप्प झाल्याने महिला, पुरुषांसह चिमुकल्यांनाही शेतशिवारातून पाणी आणावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
खंडीत वीज पुरवठ्याने ग्रामस्थ हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 4:32 PM