वारा जहागीर येथील श्रीकृष्ण लंभाडे यांच्या शेतापासून रूद्रामाय मंदिरापर्यंतच्या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर सुमारे १०० शेतकऱ्यांची शेती वसलेली आहे. अरुंद स्वरूपातील पांदन रस्ता काट्याकुपाट्यांनी व्यापला होता. ओबडधोबड रस्त्यावर विशेषत: पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात चिखल साचत होता. त्यातून वाट काढताना शेतकऱ्यांची दमछाक होत असे. शेतीपयोगी साहित्याची ने-आण करण्यासह पिकलेला शेतमाल घरी आणता येणे यामुळे अशक्य होत असल्याने शेतकरी पुरते हैराण झाले होते.
महसूल विभागाने रस्त्याची किमान दुरुस्ती करून शेतकऱ्यांना होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली; मात्र त्याची दखल कोणीच घेतली नाही. त्यामुळे अखेर जिल्हा परिषद सदस्य अर्चना डिगांबर खोरणे, भाजपा नेते डिगांबर खोरणे, धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष महादेव लांभाडे यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेत पांदन रस्त्याला लागून शेती असलेल्या सर्व शेतकऱ्यांशी चर्चा केली. लोकवर्गणीतून जेसीबीच्या सहाय्याने विनाविलंब रस्त्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो, ही बाब लक्षात आणून दिली. शेतकऱ्यांनीही विलंब न करता दोन लाखांची लोकवर्गणी गोळा केली. त्यातून पांदन रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ४ जून रोजी पीटीओ राऊत, बाळू मुरकुटे, सरपंच सुगंधा कांबळे, प्रभारी गटविकास अधिकारी प्रमोद बदरके यांनी रस्ता कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.