लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात अद्याप कोरोना विषाणूचा एकही रूग्ण आढळला नाही. तथापि, संभाव्य धोका लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील अनेक ठिकाणचे ग्रामस्थ वास्तव्यासाठी शेतशिवारात जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग महाराष्ट्रात दिसू लागल्यानंतर या विषाणूपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी प्रत्येक जण आवश्यक ती खबरदारी घेत आहे. कधी तोंडाला कापड न शिवणारी मंडळीही आता मास्क, रुमाल बांधून वावरताना दिसत आहे. वाशिम जिल्ह्यातही हीच स्थिती आहे. त्यात ग्रामीण भागातील जनतेत मात्र मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गाची मोठी भीती पसरली आहे. परजिल्ह्यातून परतलेल्या २३२०९ नागरिकांची आरोग्य विभागाने तपासणी करून त्यांना १४ दिवस घरात थांबण्याचा, कोणाशीही संपर्क न ठेवण्याच्या सुचना दिल्या. या लोकांच्या संपर्कात येण्यामुळे किंवा इतरही कारणांमुळे आपल्याला कोरोना विषाणूचा संसर्ग होईल, अशी भीती ग्रामस्थांना वाटत असल्याने विविध गावातील मंडळी मुलाबाळांसह शेतशिवारात वास्तव्यासाठी धाव घेत असल्याचे दिसत आहे. त्यात मालेगाव तालुक्यातील शिरपूर, राजुरा आणि भामटवाडी, तर मानोरा तालुक्यातील सावळी येथील निम्म्याहून अधिक परिवारांनी ट्रॅक्टरमध्ये बिºहाड वाहून नेत शेतशिवारात बस्तान मांडले आहे. काहींनी शेतात शेतमाल ठेवण्यासाठी केलेले पक्के बांधकाम त्यांना उपयोगी पडत आहे.
जिवनावश्यक वस्तंूचा पुरेसा साठागावखेडे सोडून शेतशिवारात गेल्यानंतर खाण्यापिण्याच्या अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बहुतांश कुटुंबांनी किमान १५ ते २० दिवस पुरेल एवढे आवश्यक साहित्यच सोबत नेले आहे. त्यात अन्नधान्यासह इतर वस्तूंचाही समावेश आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात येईपर्यंत गावात न परतण्याचा निर्णय या कुटुंबांनी घेतला आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी दक्षता म्हणून मुलाबाळासह गावापासून ३ किलोमीटर अंतरावरील स्वत:च्या शेतात खोपडी बांधून वास्तव्य केले आहे.-नामदेव ग्यानुजी ढोंबळे,शेतकरी, राजुरा
जनतेच्या मनात कोरोनाची भीती निर्माण होऊ नये, यासाठी घरात थांबण्याचा आणि गर्दी न करण्याच्या सुचना प्रत्येकाला दिल्या; परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गाची मोठी भीती निर्माण झाल्याने गावातील काही परिवारांनी वास्तव्यासाठी शेतशिवारात धाव घेतली आहेगोपाल शेळके,पोलीस पाटील, सावळी (मानोरा)