कारपा (जि. वाशिम) : येथून जवळच असलेल्या रुईगोस्ता येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत शिक्षण विभागाच्या होत असलेल्या दुर्लक्षामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकून आपला रोष व्यक्त केला. रुईगोस्ता येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवीसाठी केवळ तीनच शिक्षक कार्यरत आहेत. तुकड्या आणि विद्यार्थी संख्या पाहता किमान ८ शिक्षकांची आवश्यकता आहे. मात्र, याठिकाणी प्रत्यक्षात केवळ तीनच शिक्षक अध्यापनाचे कार्य करित आहेत. रिक्त असलेल्या शिक्षकांची पदे भरण्यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेकवेळा मानोरा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे निवेदने सादर केली. मात्र, ही महत्वपूर्ण मागणी बेदखल ठरल्याने अखेर नाईलाजास्तव शाळा व्यवस्थापन समिती व गावकर्यांनी शाळेला कुलूप ठोकले. दरम्यान गटशिक्षण अधिकारी डी. बी. पवार यांच्याशी संपर्क साधला असता, रुईगोस्ता येथील जिल्हा परिषद शाळेवर पुरेसे शिक्षक देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट केले.
ग्रामस्थांनी ठोकले शाळेला कुलूप!
By admin | Published: June 28, 2016 2:41 AM