नागपूर ते औरंगाबाद या महामार्गाची अशक्ष: चाळण झाली असून, खड्डे चुकवताना झालेल्या अपघातात अनेकांचा बळी गेला आहे. तरीही या मार्गाच्या दुरुस्तीचे भिजत घोंगडे कायम आहे. मालेगाव येथून रस्त्याचे काम सुरू झाल्याचे दिसून येत असले तरी आधे खड्डे बुजविणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. याचा नाहक त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. खड्ड्याचा आकार माेठा असल्याने वाहनाचे संपूर्ण चाक त्या खड्ड्यांमध्ये जात आहे.
वाशिम जिल्ह्यातून जाणारा नागपूर ते औरंगाबाद हा मुंबईला जोडणारा अतिशय कमी अंतराचा महामार्ग आहे. रात्रंदिवस या महामार्गावरून लहान मोठ्या वाहनांची येऱ्जा सुरू असते; मात्र गेल्या दीड-दोन वर्षांपासून या महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली असून, शेलूबाजार ते मालेगावदरम्यान या मार्गाची अशक्षः चाळण झाली आहे. जागोजागी मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता, असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे. या रस्त्यावरून वाहन चालविणे म्हणजे तारेवरची कसरत ठरत आहे. नव्हेतर प्रत्यक्ष मृत्यूला आमंत्रण ठरत आहे. या रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात आजपर्यंत अनेक वाहनचालक व प्रवाशांचा बळी गेला आहे. अनेकांना अपंगत्व आले आहे. आमदार, खासदार, मंत्री साहेब किती लोकांचा बळी गेल्यावर या महामार्गाची दुरुस्ती करणार, असा प्रश्न वाहनचालक व प्रवाशांमधून उपस्थित केल्या जात आहे. तर दुसरीकडे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक काम प्रगतिपथावर असल्याचे सांगत आहेत. याबाबत राेष व्यक्त केला जात आहे.