यवतमाळ जिल्ह्यातून मानोरा तालुक्यातील ग्रामीण मार्गाचा आधार घेत गेल्या अनेक महिन्यांपासून रात्रीच्या सुमारास गुरांची अवैध वाहतूक एक दिवस आड सुरू होती. वाहनांत गुरांना कोंबून आणि वरून ताडपत्रीने झाकून ही वाहतूक सुरू होती. त्यामुळे या वाहतुकीबाबत स्थानिक ग्रामस्थांना संशय होता. बुधवारी रात्रीही गुरांची वाहतूक करणारी दोन वाहने ग्रामस्थांना दिसली. त्यावेळी ग्रामस्थांनी वाहनांना अडविले. त्यात एक वाहनचालक वाहन घेऊन पसार होण्यात यशस्वी झाला, तर एक वाहन ग्रामस्थांनी रोखले. पाहणी केली असता त्यात आठ गायी कोंबून नेण्यात येत असल्याचे दिसून आले. यावरून ग्रामस्थांनी मानोरा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोघांना ताब्यात घेतले, तर ग्रामस्थांनी वाहनातील गायी बाहेर काढून गजेघाटात ठेवल्या आहेत.
---------
इतर प्रकारची अवैध वाहतूक जोरात मानोरा तालुक्यातील म्हसणी, तोरणाळा, इंझोरी, रामगाव या मार्गाने गुरांची अवैध वाहतूक होत असतानाच इतरही प्रकारची अवैध वाहतूक रात्रीच्या वेळी सर्रास पाहायला मिळते. पोलिसांना गुंगारा देऊन हा प्रकार करण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या मार्गावर पोलिसांनी लक्ष ठेवून कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे मत ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
------------
पीक नुकसानाच्या मदतीची प्रतीक्षा
इंझोरी: गेल्या १५ दिवंसापूर्वी परिसरात अवकाळी पावसामुळे हरभरा, गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचा पंचनामाही मागणीनुसार करण्यात आला, परंतु शेतकऱ्यांना अद्यापही शासनाकडून मदत मिळू शकली नाही.
--------