लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम): तालुक्यातील मोहजा इंगोले येथे भारतीय जैन संघटना आणि महाराष्ट्र शासनात झालेल्या सामंजस्य करारानुसार नाला खोलीकरणाचे काम प्रगती पथावर आहे. या कामाची प्रेरणा घेवून गावकऱ्यानी आता स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत लोकसहभागातून गावातील सिमेंट नाला बंधाऱ्याची दुरूस्ती करण्याचा निर्धार केला आहे. या कामास लवकरच सुरूवात केली जाईल, अशी माहिती बाजार समिती संचालक तथा मोहजाचे सरपंच घनश्याम मापारी यांनी दिली.‘सुजलाम्-सुफलाम् वाशिम’ या अभिनव मोहिमेंतर्गत रिसोड तालुक्यातील गावांमध्येही आता जलसंधारणाच्या विविध स्वरूपातील कामांना गती मिळाली आहे. विशेष बाब म्हणजे त्यास गावागावातील ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळत आहे. मोहजा इंगोले येथेही नाला खोलीकरणाचे काम दर्जेदार होत असून ते सद्या प्रगतीपथावर आहे. दरम्यान, शासन आणि ‘बीजेएस’ने घेतलेल्या या पुढाकारापासून प्रेरणा घेत गावातील नाल्यावर असलेल्या सिमेंट बंधाऱ्याची दुरूस्ती लोकसहभागातून करण्याचा निर्णय गावकऱ्यानी घेतला आहे. त्यानुषंगाने घनश्याम मापारी यांच्यासह विजय इंगोले, डिगांबर इंगोले, सतीश इंगोले, सुरेश शिंदे,मारोती इंगोले, रवि जाधव, अर्जुन तुरूकमाने, शेषराव जाधव, कैलास जाधव, बंडू मोरे, कैलास इंगोले, नथ्थूजी शिंदे, विजय हुंबे यांच्यासह अन्य गावकऱ्यानी नादुरूस्त असलेल्या सिमेंट नाला बंधाºयाची पाहणी करून प्रत्यक्ष कामास लवकरच सुरूवात करण्याचा निर्णय घेतला.
गावकरी करणार लोकसहभागातून बंधाऱ्याची दुरूस्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 4:29 PM