यासंदर्भात कारंजा तालुक्यात विशेष मोहीम राबवून होम आयसोलेशनमधील रुग्णांची तपासणी करण्यात आली. ‘लाेकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर कारंजा तालुक्यामध्ये होमआयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या रुग्णांकडून नियमांचे पालन होत असल्याची खात्री करण्यासाठी गुरुवार, दि.११ मार्च रोजी उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, प्रभारी पोलीस उपअधीक्षक अनिल ठाकरे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी कालिदास तापी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादासाहेब डोल्हारकर, पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांच्या पथकांनी शहरी व ग्रामीण भागात अचानक गृहभेटी देऊन तपासणी केली. यामध्ये कामरगाव येथील एक व्यक्ती होमआयसोलेशन नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर फिरत असल्याचे निदर्शनास आले. या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याची सक्तीने कारंजा येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली आहे.
.............
‘होमआयसोलेशन’ नियमांचे पालन करा
आपल्यापासून इतरांना कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी होमआयसोलेशनमधील रुग्णांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. याबाबत तपासणी करण्यासाठी प्रशासनामार्फत अचानक गृहभेटी देऊन तपासणी करण्यात येत आहे. गुरुवारी करण्यात आलेल्या तपासणीत एका व्यक्तीकडून होमआयसोलेशन नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यापुढेही शहरी व ग्रामीण भागात अचानक तपासणी करून होमआयसोलेशन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून, त्यांची रवानगी संस्थात्मक विलगीकरण कक्षात केली जाणार आहे, असे कारंजाचे उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले.