कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदीचे आदेश लागू असून, लग्न समारंभातील उपस्थितीवर मर्यादा आली आहे. २५ पेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती नको, अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. या नियमांचे पालन होते की नाही, याची खात्री करण्यासाठी मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर व चमूतर्फे शहरात तपासणी करण्यात येते. कारंजा येथील गुलाबराव आमटे यांच्या येथे विवाह सुरू असल्याच्या माहितीवरून कोरोना प्रतिबंधक पथक यांनी छापा टाकला असता त्या ठिकाणी २५ पेक्षा अधिक नागरिक हे विनामास्क आढळून आले. त्यामुळे त्यांना १० हजार रुपये दंड व सालासार मंगल कार्यालयाचे मालक चाडक यांना २५ हजार असा एकूण ३५ हजार रुपये दंड आकारण्यात आला. शहरातील कुणाकडेही लग्न सोहळा असल्यास २५ पेक्षा अधिक मंडळी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी डोल्हारकर यांनी सांगितले.
नियमाचे उल्लंघन; मंगल कार्यालयावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:43 AM