लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात वाढता काेराेना संसर्ग पाहता हाॅटेल व्यावसायिकांना पार्सल सुविधा देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत, परंतु या नियमांचे सर्रास उल्लंघन हाेत असून, काही हाॅटेलव्यावसायिक चक्क हाॅटेलमध्ये बसून ग्राहकांना सेवा देत असल्याचे ५ मार्च राेजी ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीवरून दिसून आले.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्राबाहेरील क्षेत्रात लागू करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशांना ८ मार्च २०२१ रोजीच्या सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी यांनी मुदतवाढ दिली हाेती संचारबंदी काळात जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहतील. रोज रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी राहील. या काळात रुग्णालये, रुग्णवाहिका, औषधी दुकाने, ठोक भाजीपाला विक्री, रेल्वे स्थानक व बस स्थानक तसेच खाजगी बसने उतरणाऱ्या प्रवाशांकरिता ऑटोरिक्षा, हायवेवरील पेट्रोल पंप, धाबे, एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग सुरू राहतील. या उद्योगांचे कर्मचारी, कामगार यांना त्यांच्या कार्यालयाच्या ओळखपत्राच्या आधारे जाण्या-येण्याकरिता परवानगी देण्यात आली हाेती. तसेच घरपोच दूध वितरण, रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांच्या घरपोच वितरणास सकाळी ६ ते सकाळी ९ वाजेपर्यंत तसेच सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली हाेती. यासंदर्भात ‘लाेकमत’च्या वतीने ५ मार्च राेजी शहरातील काही हाॅटेल, रेस्टाॅरंट, भाेजनालयांची पाहणी केली असता अनेक ठिकाणी हाॅटेल व्यावसायिक चक्क ग्राहकांना हाॅटेलमध्ये प्रवेश देत असल्याचे दिसून आले. यामुळे काेराेना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या भागातील हाॅटेलची केली पाहणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे काही हाॅटेलचालक उल्लंघन करीत असताना संबंधितांकडून काेणतीही कारवाई केली जात नसल्याचे ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीवरून दिसून आले. वाशिम शहरातील पुसद नाका, रिसाेड राेड, अकाेला रस्त्यावरील हाॅटेलमध्ये हा प्रकार सर्रास दिसून आला. असाच प्रकार शहरातील इतरही हाॅटेलमध्ये सुरू असल्याची माहिती असून, याकडे संबंधितांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
छुप्या मार्गाने ग्राहकांना प्रवेशशहरातील तसेच शहराबाहेरील काही हाॅटेलमध्ये समाेरून दरवाजा बंद करून मागच्या दरवाजाने छुप्या पद्धतीने प्रवेश दिला जात असल्याचेही ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीवरून दिसून आले. हाॅटेलचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून हाॅटेलसमाेर एक कर्मचारीही उभा ठेवण्यात येत आहे.