संचारबंदी काळात वैध कारणासाठी प्रवासी वाहतूक सुरू राहणार असून ऑटो रिक्षामध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये (चारचाकी) चालक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी, बसमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या क्षमतेएवढे प्रवासी घेण्यास मुभा आहे, मात्र उभा राहून प्रवास करण्यास मनाई आहे. प्रवासादरम्यान प्रत्येक प्रवाशाने योग्यरित्या मास्क परिधान केलेला केलेला असणे बंधनकारक आहे. चारचाकी टॅक्सीमध्ये एखाद्या व्यक्तीने व्यवस्थितरित्या मास्क परिधान केला नसेल अशावेळी प्रवाशांसह चालकाविरुद्धही दंड आकारण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांनी ९८५०८७३२८७ किंवा ९९२३३१७९०९ या व्हाॅटस ॲप क्रमांकावर सदर वाहनाचा क्रमांक दिसेल असे छायाचित्र काढून पाठविण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन विभागाने केले होते.
शेलूबाजार-अकोला मार्गावर वाहतूक करणाऱ्या दोन खासगी प्रवासी बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेतले जात असून कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याची छायाचित्रे उपप्रादेशिक परिवहन विभागाला प्राप्त झाली. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या चमूने सदर दोन बसेस अकोला येथून ताब्यात घेतल्या असून संबंधित मालकांविरुद्ध पुढील कार्यवाही सुरू केली असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी सांगितले.
......
बाक्स
कारवाईची मोहीम तीव्र होणार
परवानगी नसलेल्या खासगी प्रवासी बसेस, क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी टॅक्सी, परवाना नसलेल्या ऑटो रिक्षा, परवाना नसलेली खासगी प्रवासी वाहने, अवैध प्रवासी वाहनांमध्ये नागरिकांनी प्रवास करू नये, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी केले आहे. कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाईची मोहीम यापुढे अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.