लोकमत न्यूज नेटवर्कधनज बु. : येथील पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या ग्राम कुपटी येथे २१ एप्रिल रोजी विवाह पार पडला. त्यात नियमापेक्षा अधिक लोकांनी सहभागी होऊन संचारबंदीचे उल्लंघन केले. याप्रकरणी पोलिस पाटील यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून नवरी, नवरदेवासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कुपटी येथील रहिवासी प्रल्हाद मोकोडे यांची मुलगी वैशाली मोकोडे (१९) हिचा विवाह अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथील रहिवासी महादेवराव कंटाळे यांचा मुलगा मोहन कंटाळे (२४) याच्याशी झाला; मात्र या लग्नाची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही, शिवाय दोन्ही पक्षांकडून पाचपेक्षा अधिक लोक या लग्नात सहभागी झाले. त्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन झाले. ही बाब लक्षात येताच येथील पोलीस पाटील स्वाती निंघोट यांनी धनज पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या कामरगाव चौकीला माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी नवरी, नवरदेवासह महादेवराव कंटाळे, शामराव कºहाळे, प्रल्हाद मोकोडे, लता मोकोडे, माधुरी लसनकार यांच्यावर भादंविचे कलम १८८, २६९ व साथ रोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
संचारबंदीचे उल्लंघन; नवरी, नवरदेवासह सात जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 4:38 PM