लोकमत न्यूज नेटवर्कधनज बु. : कारंजा तालुक्यातील पिंपळगाव बु येथे २० एप्रिल रोजी आयोजित विवाह सोहळ्यात संचारबंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याने वर, वधूसह तिघांविरूद्ध धनज बु. पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.पिंपळगाव बु. येथील रहिवासी सै.शौकत सै. सैदू यांची मुलगी हजराणा परवीन (२०) हीचा विवाह अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी सै. रशीद सै. सैदहु यांचा मुलगा सै. मुजीब सै. रशीद याचाशी २० एप्रिलला झाला. परंतु कोरोना विषाणू संसर्गामुळे लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. असे असतानाही जिल्हाबंदी तसेच संचारबंदीचे उल्लंघन केले जात असल्याचे धनज पोलिसांच्या निदर्शनात आले असता, त्यांनी वर -वधू यासह मौलवी हमीद खान शेर यांच्याविरूद्ध २० एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या विवाहास फक्त चार व्यक्तींला उपस्थित राहता येईल, असे परवानगीत नमूद आहे. परंतु प्रत्यक्षात येथे चारपेक्षा अधिक लोक असल्याचे पिंपळगाव बु येथिल पोलीस पाटील संगीता राऊत यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी याप्रकरणी धनज पोलीस स्टेशनला माहिती दिली. यावरून तिघांविरूद्ध भादंवी कलम १८८, २६९ तसेच साथरोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
संचारबंदीचे उल्लंघन; वधू-वरांसह तिघांविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 10:28 AM