लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: नाफेडअंतर्गत केवळ शेतक-यांची तूर खरेदी करण्याचे स्पष्ट निर्देश असताना अनसिंग येथील विदर्भ कृषी व प्रक्रिया पणन सहकारी संस्थेने कार्यक्षेत्राबाहेरील व्यापा-यांची निकृष्ट दर्जाची तूर हमीदराने खरेदी केली. दरम्यान, याप्रकरणी चौकशी अधिकारी तथा सहायक निबंधक ओमप्रकाश सखाराम साळुंके यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून अनसिंग पोलिस ठाण्यात ८ आॅक्टोबरला ४ व्यापारी आणि संस्थेचे सचिव यांच्याविरूद्ध; तर १४ आॅक्टोबरला अध्यक्षाविरूद्ध गुन्हे दाखल झाले, अशी माहिती १७ आॅक्टोबरला प्राप्त झाली. दरम्यान, कारवाईच्या धास्तीने आरोपींसह संबंधित संस्थेचे कर्मचारीही फरार असल्यामुळे २६ आॅगस्टपर्यंतच्या तूर खरेदीचे प्राप्त धनादेश लिहिण्याची प्रक्रिया थांबली असून ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.याबाबत प्राप्त माहितीनुसार, ३० मे पुर्वी आणि नंतर अशा दोन टप्प्यात शासकीय हमीदरानुसार जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तूर खरेदी प्रक्रिया राबविण्यात आली. अनसिंग उपबाजारांतर्गतच्या नाफेड खरेदी केंद्रावर अनसिंग येथील विदर्भ कृषी व प्रक्रिया पणन सहकारी संस्थेकडे ही जबाबदारी देण्यात आली होती. नियमानुसार संबंधित संस्थेने शेतकºयांचीच तथा चांगल्या दर्जाची तूर खरेदी करायला हवी होती. मात्र, कार्यक्षेत्राबाहेरील व्यापाºयांची निकृष्ट दर्जाची तूर शासकीय हमीभावाप्रमाणे करण्यात आली. दरम्यान, ही बाब लक्षात येताच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेने चौकशी कार्य हाती घेतले. अंतरिम चौकशी अहवालानुसार सहायक निबंधक साळुंके यांच्या फिर्यादीवरून अनसिंग पोलिसांत आरोपी रतनलाल मदनलाल हुरकट, प्रदिप विष्णूदास बजाज, नंदकिशोर भगवानदास सारडा, जगदीश दत्तात्रय राजे, बाबाराव दर्याजी लोथे अशा पाच जणांविरूद्ध कलम ४२०, ३४ भांदविनुसार गुन्हे दाखल झाले होते. दरम्यान, याप्रकरणी संस्थाध्यक्ष पांडूरंग तुकाराम ठाकरे हे देखील दोषी असल्याने त्यांच्याविरूद्धही गुन्हा दाखल करण्यासंदर्भात सहायक निबंधकांनी १३ आॅक्टोबर २०१७ रोजी अनसिंग पोलिस ठाण्याला पत्र दिले होते. त्यावरून ठाकरे यांच्याविरूद्ध १४ आॅक्टोबरला गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारामुळे जिल्हाभरातील व्यापाºयांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.
संचालक मंडळ होणार बरखास्त!विदर्भ कृषी प्रक्रिया व पणन सहकारी संस्थेचे अध्यक्ष व सचिवाविरूद्ध गुन्हे दाखल झाल्याने संस्थेचे संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यास आणखी ४ ते ५ दिवसांचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत मात्र तूरीच्या चुकाºयांचे धनादेश लिहिण्याची प्रक्रिया राबविता येणार नाही. शेतकºयांनी संयम ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन चौकशी अधिकारी तथा सहायक निबंधक ओमप्रकाश साळुंके यांनी केले.
अनसिंग येथील नाफेड खरेदी केंद्रावर ३० मे पूर्वी पहिल्या टप्प्यात झालेल्या तूर खरेदी प्रक्रियेत विदर्भ कृषी व प्रक्रिया पणन सहकारी संस्थेने कार्यक्षेत्राबाहेरील व्यापाºयांकडून तूर खरेदी केली. विशेष गंभीर बाब म्हणजे शासकीय हमीदराने तथा व्यापाºयांकडून खरेदी करण्यात आलेली ही तूर निकृष्ट दर्जाची असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळेच प्रथमदर्शनी संस्थेचे अध्यक्ष, सचिवासह सहा जणांविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.- रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम