लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : एक दिवस मतदानासाठी, लोकशाहीच्या हितासाठी, लोकशाहीचा नारा, सर्वांनी मतदान करा यासारख्या घोषणा देत ५ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाने ’स्वीप’ उपक्रमांतर्गत मतदार जनजागृती रॅली काढली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून सकाळी ७.३० वाजता मोटारसायकल रॅली तर सकाळी ८ वाजता विद्यार्थ्यांच्या पायदळ रॅलीला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप समितीचे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.यावेळी अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक गोहाड, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी व्यंकट जोशी, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, नितीन माने, सुदाम इस्कापे, माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नरळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, कृषी विकास अधिकारी नरेंद्र बारापात्रे, ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी सु. गो. वायकर यांच्यासह शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून सुरु झालेली मोटारसायकल रॅली अकोला नाका, पाटणी चौक, शिवाजी चौक, पुसद नाका, पंचायत समिती रोड, सिव्हील लाईन रोडमार्गे जिल्हा परिषद इमारत परिसरात आल्यानंतर या रॅलीचा समारोप करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. सर्वप्रथम उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांना जिल्हाधिकारी मोडक यांनी मतदानाची शपथ दिली. पायदळ रॅलीमध्ये शहरातील विविध १२ शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
मोटारसायकल व पायदळ रॅलीद्वारे मतदार जागृती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 5:40 PM