३१ जानेवारीला होणार प्रसिद्ध: निवडणूक आयोगाचे निर्देश लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षीप्त मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला असून, अंतिम मतदार यादी प्रकाशनाची तयारीही करण्यात आली आहे. तथापि, या प्रक्रियेत विविध तांत्रिक अडचणी येत असल्याने निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा मतदार यादी प्रकाशनाची मुदत वाढवून ३१ जानेवारी केली आहे. त्यानुसार वाशिम जिल्ह्याची अंतिम मतदार यादी ३१ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या विशेष संक्षीप्त मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ३६८९२ नव मतदारांची नोंदणी करण्यात आली, तर १४७५ मयत मतदारांची नावे वगळण्यात आली, तसेच ४४५ मतदारांचे स्थानांतरण करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात मतदार यादी वाचन प्रक्रिया राबविण्यात आली आणि या अंतर्गत मतदारांकडून दाखल करण्यात आलेल्या हरकती आणि आक्षेपानुसार दुरस्त्या करून एकूण ४७८०५ मतदारांची यादी अद्ययावत करण्यात आली. या नंतर तयार झालेली अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तयारी जिल्हा निवडणूक विभागाने केली आहे; परंतु राज्यातील काही जिल्ह्यांच्या याद्यांची दुरुस्ती तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित असून, राज्यात एकाच वेळी सर्व जिल्ह्यांची मतदार यादी प्रसिद्ध व्हावी या उद्देशाने निवडणूक आयोगाने पूर्वी २० जानेवारीपर्यंत दिलेली अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची मुदत वाढवून ३१ जानेवारी केली आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्याची अंतिम मतदार यादी ३१ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे.
मतदार यादी प्रकाशनाला पुन्हा मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:55 PM