जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने उर्वरित १५२ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील राजकारण ढवळून निघत असून, जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी, प्रमुख पक्षांचे जिल्हाध्यक्ष, स्थानिक पातळीवरील पॅनलप्रमुखांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणूक विभागाने या मतदान प्रक्रियेसाठी जय्यत तयारी केली असून, संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
पोलीस बंदोबस्त
जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला आहे. यात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि महिला व पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांसह होमगार्ड मिळून २५५२ पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
--------
कोट : जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.१५) मतदान होणार आहे. ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रांवर वीजपुरवठ्यासह सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाधित मतदार, उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसाठी मतदान संपण्याच्या पूर्वी अर्धा तासाची वेळ ठेवण्यात आली असून, यावेळी विशेष दक्षता घेतली जाणार आहे.
- सुनील विंचनकर,
निवडणूक निर्णय अधिकारी
-------
संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष
जिल्ह्यात ५० संवेदनशील आणि ११ अतिसंवेदनशील मतदान केंद्रे असून, येथे मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार, वादविवाद होऊ नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. याशिवाय फिरते पथकही भेटी देऊन पाहणी करणार आहे.
--------
१८ जानेवारी रोजी निकाल
जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाल्यानंतर तालुकास्तरावर १७ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.
-----
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेसाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. यात मतदान कालावधी संपण्याच्या आधी बाधित मतदारांसह बाधित आढळणारे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसाठी अर्धातास मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांना पीपीई कीट उपलब्ध करून दिली जाणार आहे.