यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघात वाढलेली मतदानाची टक्केवारी कुणाच्या पथ्यावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 02:34 PM2019-04-13T14:34:46+5:302019-04-13T14:35:02+5:30

  वाशिम : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मोठा उत्साह दाखवल्याने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत सव्वा दोन टक्क्याने वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे

Voting percentage increased in the Washim Lok Sabha constituency; Who will get advantage | यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघात वाढलेली मतदानाची टक्केवारी कुणाच्या पथ्यावर?

यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघात वाढलेली मतदानाची टक्केवारी कुणाच्या पथ्यावर?

Next

- नंदकिशोर नारे / संतोष वानखडे 
 
वाशिम : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मोठा उत्साह दाखवल्याने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत सव्वा दोन टक्क्याने वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील १९ लाख १४ हजार ७८५ मतदारांपैकी ११ लाख ६९ हजार ८०६ मतदारांनी (६१.०९ टक्के) मतदानाचा हक्क बजावल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१४ मध्ये ५८.८० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. विशेष म्हणजे, पहिल्या टप्प्यात झालेल्या ७ लोकसभा मतदारसंघामध्ये केवळ यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून येत आहे.
मतदानाबाबत प्रशासनाची प्रभावी जनजागृती व वाढलेले जवळपास सव्वा दोन लाख मतदारांमुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचे मतदारांमध्ये बोलल्या जात आहे. असे असले तरी राजकीय क्षेत्रातील काही मान्यवरांशी या विषयावर चर्चा केली असता त्यांनी वेगळेच मत मांडून याचा फायदा आमच्या पक्षाला होणार असल्याचे सांगितले. प्रमुख राजकीय पक्ष काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना व ईतर काही मान्यवरांनी याबाबत आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदानाच्या वाढीव टक्केवारीचा फायदा होणार असल्याचे सांगितले. मतदानाची टक्केवारी का वाढली यासंदर्भात काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसच्या मान्यवरांशी चर्चा केली असता गत २० वर्षांपासून एकच एक व्यक्ती, विकास खुंटल्याने जनता परिवर्तनासाठी मतदानासाठी बाहेर निघाल्याचा सूर निघाला. तर भाजपा- शिवसेनेच्या मान्यवरांना विचारणा केली असता युवकांचे वाढलेले मतदान व मोदींचे युवा मनावर असलेले प्रेमामुळे मतदान टक्केवारीत वाढ झाल्याचे सांगितले. असे असले तरी, आता या वाढीव मतदान कुणाच्या पथ्यावर पडते, हे २३ मे रोजी मतमोजणीच्या दिवशी उघड होणार आहे.


यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे वाढलेले युवा मतदार होत. आणि युवा मतदारांवर मोदींचा मोठया प्रमाणात प्रभाव आहे हे कुणालाही सांगण्याची गरज नाही. लहान लेकरापासून तर जेष्ठांपर्यंत मोदींचे नाव ठाऊक आहे. युवकांच्या गळयातील ताईत मोदी बनले आहेत. आणि युवा मतदारांनी केलेले मतदान व त्यामुळे वाढलेली टक्केवारी ही यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मलाच होईल यात दुमत नाही.
-खा.भावना गवळी, शिवसेना


यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी वाढली यात दुमत नाही. परंतु यवतमाळ विधानसभा मतदारसंघामध्ये ती घटलेली आहे. टक्केवारी वाढण्याचे कारण म्हणजे नवमतदार, यापेक्षा मतदारांना हवे असलेले परिवर्तन आहे. अनेक वर्षांपासून मतदारसंघामध्ये परिवर्तन नाही आणि हे हवे असेल तर मतदार मतदानासाठी बाहेर निघतात. त्यातीलच हा एक प्रकार आहे. मतदानाची टक्केवारी वाढली म्हणजे याचा नक्कीच फायदा काँग्रेसशिवाय कोणालाही होणार नाही.
-माणिकराव ठाकरे, काँग्रेस


गत लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे काँग्रेस उमेदवाराचे प्लॅनिंग आहे. आणि दुसरे कारण हे ही असू शकते या मतदारसंघात असलेला ‘काँक्रीट’ उमेदवार जनतेला नको असावा. याशिवाय दुसरे कोणतेच कारण असू शकत नाही. मतदारांना आत ‘चेंज’ हवे असल्याने ते घराबाहेर पडलेत आणि त्यांनी मोठया प्रमाणात मतदान करुन याची टक्केवारी वाढली. आणि याचा सर्वात जास्त फायदा हा काँग्रेसच्या उमेदवारालाच होवू शकतो असा माझा स्वत:च अंदाज आहे.
-अनंतराव देशमुख, माजी राज्यमंत्री, काँग्रेस


पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदारसंघामध्ये केवळ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली त्याचे महत्वाचे कारण म्हणजे वाढलेले पावणे दोन लाख युवा मतदार होत. पहिले मतदान असल्याने त्यांनी उत्साहात व आवर्जुन मतदान केले. यामुळे टक्केवारील वाढ झाली. युवा मतदान वाढल्याने याचा फायदा हा शिवसेना - भाजपाच्या उमेदवार भावना गवळी यांना होईल. कारण युवांच्या मनावर राज्य करणारे मोदी आहेत. हे युवांना सुध्दा माहित आहे.

-आ.राजेंद्र पाटणी, भाजपा, जिल्हाध्यक्ष

Web Title: Voting percentage increased in the Washim Lok Sabha constituency; Who will get advantage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.