रिसोड शहरातील मुख्य व्यापारपेठ असलेला कलुशाबाबा दर्गाह ते वाशिम नाका यादरम्यानचा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. गंभीर बाब म्हणजे रस्त्यावर काही ठिकाणी एक ते दीड फुटापर्यंतचे खड्डे पडले आहेत. यामुळे दुचाकीचालकांना वाहने चालविताना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. असे असताना रिसोडकरांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या या प्रश्नाकडे बांधकाम विभागासह स्थानिक गावपुढाऱ्यांचेही दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)
...................
बॉक्स :
उपोषण, आंदोलनानंतरही सुटला नाही प्रश्न
रिसोड शहरातील सिव्हिल लाइनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर शाळा, महाविद्यालय, बाजार समिती, शासकीय कार्यालये, व्यापारपेठ वसलेली आहे. त्यामुळे या रस्त्यावर दैनंदिन नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्ता नव्याने तयार व्हावा, याकरिता शहरातील व्यापारी, विविध सामाजिक संघटना तथा पक्षांनी यापूर्वी अनेक वेळा उपोषण व अन्य आंदोलने केली. मात्र, त्याचा कुठलाच फायदा झालेला नाही.
......................
बॉक्स :
रस्त्याचे नूतनीकरण होणार; पण केव्हा?
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रिसोड शहरातील रस्त्याच्या नूतनीकरणासाठी १० कोटींचा निधी मंजूर आहे. त्यास प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, तांत्रिक मान्यता मिळणे बाकी आहे. सर्व सुविधांयुक्त सिमेंट-काँक्रीटचा रस्ता तयार होणार, असे सांगितले जात आहे; पण तो प्रत्यक्षात केव्हा उभारला जाईल, असा सवाल रिसोडकरांमधून उपस्थित केला जात आहे.
.................
९४० मीटर
रस्त्याची एकूण लांबी
२००८-०९
मध्ये झाले होते रस्ता नूतनीकरणाचे काम
९० लाख
रस्ता निर्मितीवर झालेला खर्च