लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाने हाहाकार माजविला असताना वाशिम जिल्ह्यात मात्र एकमेव मेडशी (ता.मालेगाव) येथील एकजण कोरोनाबाधीत असल्याचे आढळले होते. त्या रुग्णाचा अंतीम अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला; मात्र २ मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरप्रदेशच्या मयत झालेल्या ट्रक क्लिनरचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. त्याच्या संपर्कातील ५ जणांसह ‘रेड झोन’ जिल्ह्यांमधून आलेले ४ जण आणि सारीचे ३ जण अशा एकूण १२ जणांचे ‘थ्रोट स्वॅब’ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल नेमका काय येतो, याची जिल्हावासीयांना प्रतीक्षा लागली असून धाकधुक वाढली आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून खबरदारीच्या सर्व उपाययोजनांची जिल्ह्यात चोख अंमलबजावणी करण्यात आली. त्याचे सकारात्मक परिणाम होऊन मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील एकमेव रुग्णाचा अपवाद वगळता कुठेही कोरोनाबाधीत रुग्ण आढळला नाही. मेडशीच्या रुग्णाचाही अंतीम अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याने त्यास २५ एप्रिल रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यायोगे जिल्हा कोरोनामुक्त घोषित करण्यात आला; मात्र २ मे रोजी मुंबई येथून नागपूरकडे जात असलेल्या ट्रकच्या आजारी क्लिनरला जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचारार्थ दाखल केले असता, त्याचा काही तासातच मृत्यू झाला. ४ मे रोजी त्याच्या ‘थ्रोट स्वॅब’चा अहवाल कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आला. त्याच्या संपर्कातील पाच जणांचे ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यासह जिल्ह्यातीलच तिघांमध्ये ‘सारी’ची लक्षणे आढळली असून ‘रेड झोन’ जिल्ह्यांमधून परतलेल्या चौघांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहे. या सर्व १२ लोकांचे ‘थ्रोट स्वॅब’ अकोला येथील प्रयोगशाळेकडे तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल नेमका काय येतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
सारीच्या ३ रुग्णांसह १२ जणांच्या ‘थ्रोट स्वॅब’ अहवालाची प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 6:44 PM