लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरटीई (राईट टू एज्युकेशन) अंतर्गत खासगी प्राथमिक शाळेत मोफत प्रवेशासाठी निवड झालेल्या ९७६ पैकी ४९४ बालकांचे आवश्यक कागदपत्रे अद्याप पडताळणीसाठी प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे या बालकांचे प्रवेश रखडले असून, तीन संधी दिल्यानंतरही कागदपत्रे सादर केले नाही तर या बालकांना मोफत प्रवेशापासून मुकावे लागणार आहे. आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय, दिव्यांग प्रवर्गातील पात्र बालकांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत पहिल्या वर्गात एकूण प्रवेशित संख्येपैकी २५ टक्के मोफत प्रवेश दिले जातात. जिल्ह्यात १०१ शाळांची नोंदणी झाली असून एकूण १०११ प्रवेशित जागा राखीव आहेत. प्राप्त २२५६ अर्जांपैकी पहिल्या लॉटरी पद्धतीत एकूण ९७६ बालकांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पंचायत समितीऐवजी स्थानिक पातळीवर संबंधित शाळेतच विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. मोफत प्रवेशापासून निवडपात्र बालक वंचित राहू नये म्हणून पालकांना मोबाईलवर संदेशही पाठविण्यात आले. दोन वेळा संदेश पाठवूनही अद्याप ४९४ बालकांनी संबंधित शाळेशी संपर्क साधलेला नाही. ४ आॅगस्टपर्यंत ४८२ प्रवेश कन्फर्म झाले.पडताळणीसाठी कागदपत्रे सादर करण्याच्या सूचनाआरटीईअंतर्गत मोफत प्रवेशासाठी बालकाची निवड झाल्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रांची पडताळणी संबंधित शाळा स्तरावरच होत आहे. कागदपत्र पडताळणीनंतर बालकाला प्रवेश देण्यात येत आहे. संबंधित पालकांच्या मोबाईलवर संदेशही पाठविण्यात आले आहेत. पडताळणीसाठी आतापर्यंत कागदपत्रे सादर न करणाºया पालकांनी लवकरात लवकर कागदपत्रे सादर करून मोफत प्रवेश निश्चित करावा, अशा सूचना प्राथमिक शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
मोफत प्रवेशासाठी ४९४ बालकांच्या कागदपत्रांची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 5:03 PM