लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेशासाठी ७० टक्के निधी मिळाला असून, उर्वरीत ३० टक्के निधी अद्याप मिळाला नाही. हा निधी कधी मिळणार याकडे पालकांसह मुख्याध्यापक, शिक्षण विभागाचे लक्ष लागून आहे.समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दोन गणवेश खरेदी करण्यासाठी प्रती गणवेश ३०० रुपयाप्रमाणे एकूण ६०० रुपये मिळतात. यावर्षी डीबीटीद्वारे (थेट हस्तांतरण लाभ योजना) विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली होती. यावर्षी यामध्ये बदल केला असून, गणवेशाची रक्कम मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समितीच्या संयुक्त बँक खात्यात जमा करण्यात आली. जिल्ह्यातील ६० हजार २३० विद्यार्थ्यांसाठी ३ कोटी ६१ लाख ३८ हजार रुपये प्राप्त होणे अपेक्षीत असताना आतापर्यंत २ कोटी ६७ लाख ६९ लाख ६१६ रुपये प्राप्त झाले आहेत. त्यातून प्रति विद्यार्थी ४०० रुपये प्रमाणे २ कोटी ६५ लाख १२ हजारांची रक्कम जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील शाळांच्या खात्यांवर जमा करण्यात आली. जिल्ह्यातील ६० हजार ८० विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी जवळपास ९४ लाख रुपयांचा निधी अपुरा असल्याने आणि शाळांना दोन गणवेशांसाठी केवळ ४४० रुपये प्रमाणे निधी देण्यात आला असल्याने गणवेश खरेदी करताना संबंधित शाळा आणि शाळा व्यवस्थापन समित्यांची पंचाईत होत आहे. आतापर्यंत ७० टक्के रक्कम मिळाली असून, उर्वरीत ३० टक्के रकमेची प्रतिक्षा कायम आहे.
मोफत गणवेश खरेदीसाठी ७० टक्के रक्कम मिळाली आहे. उर्वरीत ३० टक्के रक्कम एमपीएसपीकडून अद्याप मिळाली नाही.- अंबादास मानकर,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद वाशिम