वाशिम जिल्ह्यात जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत नियंत्रणात आलेला कोरोना संसर्ग आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जिल्ह्यातील आजवरच्या बाधितांची संख्या आठ हजारांच्यावर पोहोचली आहे. त्यात गेल्या आठवडाभरातच जिल्ह्यात हजारांहून अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला, तर एकाचा कोरोनामुळे मृत्यूही झाला. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. त्यात उन्हाचा पाराही वाढू लागला आहे. शेतकऱ्यांना याच वातावरणात सोयाबीन मोजणीसाठी रस्त्यावर दिवसभर ताटकळत प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र मंगरूळपीर कृषी बाजार समितीअंतर्गत शेलूबाजार येथील उपबाजारात दरदिवशी दिसत आहे. सोयाबीन विक्रीसाठी धडपड करणारे शेतकरी अगदी सकाळी ६ वाजल्यापासूनच शेलूबाजार येथे दाखल होतात. त्यामुळे अकोला - मंगरूळपीर मार्गावर उपबाजाराच्या प्रवेशद्वारपुढे एक किलोमीटर अंतरात सोयाबीनच्या वाहनांची रांगच लागल्याचे चित्र सायंकाळपर्यंत दिसते.
------------
सोयाबीनची आवकही विक्रमी जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत आहे. त्यात शेतकरी पुढील खरीप हंगामाच्या तयारीला लागले असून, सोयाबीनला प्रतिक्विंटल ५ हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळत आहेत. त्यामुळे सोयाबीन विकून मोकळे होण्याची धडपड शेतकरी करीत असल्याने शेलूबाजार येथील उपबाजारात सोयाबीनची विक्रमी आवक होत आहे. त्यात गत तीनच दिवसांत २३ ते २५ फेब्रुवारीपर्यंत या बाजारात १० हजार क्विंटलपेक्षा अधिक प्रमाणात सोयाबीनची आवक झाली होती.