वाशिम - तत्कालिन जिल्हास्तरीय निवड समिती बरखास्त झाल्याने आणि अद्याप नवीन समिती गठीत करण्यात न आल्याने जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांची निवड रखडली आहे. याकडे पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे, असा सूर वृद्ध कलावंत व साहित्यिकांमधून उमटत आहे.
राज्यात शासनातर्फे वृद्ध कलावंत, साहित्यिक मानधन योजना १९५४-५५ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे वृद्ध कलावंत, साहित्यिकांना मोठा आधार मिळाला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कालानुरूप अनेक सुधारणा करण्यात आल्या असून, मानधनाच्या रकमेत वाढही करण्यात आली आहे. ‘अ’ वर्गवारीतील वृद्ध कलावंतांना २१०० रुपये, ‘ब’ वर्गवारीतील वृद्ध कलावंतांना १८०० तर ‘क’ वर्गवारीतील वृद्ध कलावंतांना १५०० रुपयाचे मानधन निश्चित करण्यात आले आहे. गत काही महिन्यांपासून या मानधन प्रक्रियेला आॅनलाईन प्रणालीची जोड देण्यात आली आहे.आवश्यक ती कागदपत्रे व बँक खाते क्रमांक सादर केलेल्या वृद्ध कलावतांना मानधनाची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते. वृद्ध कलावंतांची निवड करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे अर्ज मागविले जातात. वाशिम जिल्ह्यात दरवर्षी ६० या प्रमाणे वृद्ध कलावंतांची निवड जिल्हास्तरीय समितीतर्फे केली जाते. या समितीचे गठण पालकमंत्र्यांच्या सुचनेनुसार केले जाते. सन २०१७-१८ या वर्षात पालकमंत्री बदलल्याने तत्कालिन समिती बरखास्त झाली. अद्याप नवीन समितीचे गठण झाले नाही. त्यामुळे अर्ज सादर केलेल्या वृद्ध कलावंतांची निवड प्रक्रिया रखडली आहे.
दरम्यान, यापूर्वी पात्र ठरलेल्या व अनुदान मंजूर झालेल्या वृद्ध कलावतांना दरमहा मानधन मिळत नाही. तीन-चार महिन्यातून एकदा मानधन मिळत असल्याने शासनाने दरमहा मानधन द्यावे, अशी मागणी वृद्ध कलावंतांमधून होत आहे.