शिरपूर जैन: वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर लघू सिंचन प्रकल्पांतर्गत कालव्यासाठी २००५ ते २००७ या कालावधित संपादीत केलेल्या शेतजमिनींचा मोबदला अद्यापही संबंधित शेतकºयांना मिळालेला नाही. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रकल्पबाधित शेतकरी हताश झाले असून, येत्या महिनाभरात याची दखल घेण्यात न आल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे या शेतकºयांनी सांगितले आहे.
मालेगाव तालुक्यातील शिरपूरपासून अवघ्या दिड किलोमीटर अंतरावर असलेल्या मिर्झापूर लघू सिंचन प्रकल्पासाठी २००५ ते २००७ या कालावधित कालव्यांचे खोदकाम करण्यात आले. यामध्ये संजय गरड, गणपत घोडमोडे, सुभाष घोडमोडे, बबन घोडमोडे या शेतकºयांची शेतजमीन गेली. त्यामुळे संबंधित शेतकºयांना नियमानुसार शेतजमिनींचा मोबदला मिळणे अपेक्षीत होते; परंतु १० वर्षांहून अधिक काळ उलटला तरी, यामधील एकाही शेतकºयाला त्याच्या जमिनीचा मोबदला म्हणून दमडीही मिळाली नाही. महत्त्वाची बाब म्हणजे सदर कालव्याचे खोदकामही अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे प्रत्यक्षात प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कालव्याचे बांधकाम करण्यात येणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित शेतकºयांनी वारंवार लघू सिंचन विभागासह इतर संबंधित अधिकाºयांकडे त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्याची मागणी केली; परंतु अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी हताश झाले असून, येत्या महिनाभरात त्याची दखल घेऊन शेतजमिनीचा मोबदला मिळाला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा शेतकºयांच्यावतीने देण्यात आला आहे.