संतोष वानखडे वाशिम, दि. २६- राज्य व देशपातळीवर नावलौकीक असलेली विविध धर्मियांची तिर्थस्थळे व पर्यटन स्थळे वाशिम जिल्ह्यात आहेत. पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला या ति र्थक्षेत्रांचा आढावा घेतला, अद्यापही या तिर्थ व पर्यटन स्थळांना सवार्ंगीन विकासासाठी शासनाच्या भरीव निधीची प्रतीक्षा असल्याचे दिसून आले.बंजारा बांधवांची काशी म्हणून देशभर ओळख असलेले पोहरादेवी संस्थान, जैन बांधवांची काशी मानल्या जाणारे शिरपूर जैन, हिंदू बांधवांचे ऐतिहासिक श्री बालासाहेब संस्थान, मुस्लिम बांधवांचा ऐतिहासिक तर्हाळा दर्गा, प्रती पंढरपूर म्हणून ओळख असलेले डव्हा संस्थान, विदर्भात प्रसिद्ध असलेले सखाराम बाबांचे संस्थान श्रीक्षेत्र लोणी हे वाशिम जिल्ह्यात वसले आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वाशिमनगरीत श्री बालासाहेबांचे प्रसिद्ध मंदिर आहे. सदर मंदिर भोसले कालीन असल्याचे सांगण्यात येते. शहरातील वेशी, तलाव प्राचीन वैभवाची साक्ष देतात. राजे वाकाटकांची राजधानी म्हणून वारसा लाभलेल्या वत्सगुल्म नगरीच्या उदरात नाना ऐतिहासीक पुरावे दडलेले आहेत. सन १९९७ पूर्वी पुरातत्व विभागाला काही पुराव्यांचे अवशेष आढळूनही आलेले आहेत. मात्र, त्यानंतर पुरेशा निधीअभावी उत्खननाची बत्ती गुल झाली. ती अद्यापही गुलच आहे. श्री बालासाहेब संस्थानसह शहरातील प्राचीन पर्यटन स्थळांचा सर्वांंगीन विकास होण्यासाठी शासनाच्या भरीव निधीची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यातील पोहरादेवी संस्थानला शासनाने ह्यबह्ण वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. दरवर्षी रामनवमीला येथे आयोजित भव्य यात्रेला देशभरातून लाखो भाविक येत असतात. पोहरादेवीच्या सर्वांंगीन विकासासाठी शासनाने तिर्थक्षेत्र विकास कृती आराखडा तयार करून कोट्यवधी रुपयांची तरतूद केली. प्रत्यक्षात या कामांना सुरूवात होण्याची प्रतीक्षा आहे. शिरपूर येथे अंतरिक्ष पार्श्वनाथांचे मंदिर आहे. त्यामुळे देशभरातील जैन बांधवांचे येथे येणे-जाणे सुरू असते. मुनीश्री विमलहंस विजयजी महाराज यांच्या महत्प्रयासाने पारस बागेतील विकासासाठी श्वेतांबर जैन समाजबांधव पुढे आल्याने विकासकामे झपाट्याने सुरू आहेत. शासनाच्या भरीव निधीचा आधार मिळाला तर पर्यटन क्षेत्राचा अधिक चांगल्या प्रकारे सर्वांंगीन विकास होईल, यात शंका नाही. जिल्ह्याचे प्रति पंढरपूर म्हणून श्रीक्षेत्र डव्ह्याची ओळख आहे. संत नाथनंगे महाराज व विश्वनाथ बाबांच्या पावन स्पर्शाने ही भूमि पूनित झालेली आहे. दरवर्षी येथे भव्य यात्राही भरते. मात्र, खर्या अर्थाने विकास या तिर्थक्षेत्रापर्यंंत पोहचू शकला नाही. शासनाच्या भरीव निधीची प्रतीक्षा या संस्थानला आहे. या सर्व तिर्थक्षेत्र व पर्यटन स्थळांचा सर्वांंगीन विकास झाला तर पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल. त्यामुळे स्वाभाविकच जिल्ह्यातील आर्थिक उलाढाल वाढेल. विदर्भ व मराठवाड्यात प्रसिद्ध असलेले वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र लोणी येथील संत सखाराम बाबा संस्थान, शिरपूर येथील जानगीर बाबा संस्थान तसेच मियाँबाबा दर्गा, रिठद येथील श्री संत गजानन महाराज संस्थान, मंगरुळपीर येथील बिरबलनाथ महाराज संस्थान, कारंजा येथील गुरू मंदिर संस्थान, हिवरा येथील गणपती संस्थान, बिटोडा भोयर येथील श्री संत गजानन महाराज संस्थान आदी संस्थानच्या सर्वांंगीन विकासासाठी तिर्थक्षेत्र विकास निधीतून भरीव तरतूद होणे अपेक्षीत आहे.
वाशिम जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना विकासाची प्रतीक्षा !
By admin | Published: September 27, 2016 2:22 AM