आनंदा खुळे /कारपा (जि. वाशिम): मानोरा तालुक्यातील रुई गोस्ता येथे आदिवासी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा १0 मे २0१५ रोजी पार पडला; परंतु या सोहळय़ात विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांना शासनाच्या नियमानुसार अद्यापही आर्थिक लाभ देण्यात आलेला नाही. आदिवासी विभागाच्या संबंधित अधिकार्यांच्या दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मानोरा तालुक्यातील रुई गोस्ता येथे प्रथमच आदिवासी समाजाचा भव्य असा सामूहिक विवाह नोंदणी सोहळा १0 मे रोजी आयोजक व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळय़ात जवळपास ३२ जोडपी विवाहबद्ध झाली; परंतु आदिवासी विभागाकडूून या ३२ जोडप्यांना अद्यापही कोणताच लाभ मिळाला नसल्याने या प्रकरणी त्यांची फसवणूक तर करण्यात आली नाही ना, अशी शंका या सोहळय़ात विवाहबद्ध झालेल्या जोडप्याकडून उपस्थित करण्यात येत आहे. आदिवासी समाजाचा सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये नोंदणी विवाह अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली, वाशिम जिल्हा युवा शाखा तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. विवाह सोहळ्याला उपस्थिती म्हणून आयोजक जावळेसह वलास वाघमारे, विदर्भ युवा अध्यक्ष आणि राजूभाऊ तोडसाम यांच्या हस्ते पार पडला; परंतु यावेळेस संबंधित आदिवासी कार्यालय अकोला येथील एकाही प्रतिनिधीची उपस्थिती नव्हती. विवाह सोहळय़ात सहभागी जोडप्यांना नोंदणीचा धनादेश कधी मिळणार, या बाबत या विवाह सोहळय़ाचे आयोजक जावळे यांच्याकडे विचारपूस केली असता शासनाकडून मिळणारे आर्थिक अनुदान आठ दिवसांत येईल, १५ दिवसांत येईल, अशी टोलवाटोलवीच उत्तरे देत आहेत. तर अकोला येथील आदिवासी प्रकल्प विकास अधिकार्यांकडे चौकशी केली असता सदर सामूहिक विवाह सोहळय़ातील जोडप्यांची कागदपत्रे तसेच ग्रामपंचायचे दाखले जोडण्यात आली की नाही, तेच त्यांना माहीत नसल्यामुळे त्याबाबत चौकशी करून काम मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासी जोडप्यांना आर्थिक लाभाची प्रतीक्षा
By admin | Published: October 16, 2015 1:59 AM