शेतीला सिंचनाची जोड म्हणून जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागातर्फे कोल्हापुरी बंधारे, लघु प्रकल्प, गावतलावाची निर्मिती केली जाते. मालेगाव तालुक्यात ४० पेक्षा अधिक बंधारे, लघु प्रकल्प असून, देखभाल-दुरुस्ती, बळकटीकरण, सिंचन क्षमता पुनरुज्जीवन आदींसाठी निधी मिळावा म्हणून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता; मात्र अद्याप निधी मिळाला नाही. प्रकल्पांच्या गेटमध्ये बिघाड, भिंतीवर वाढलेली झाडेझुडपे तसेच इतर कारणांमुळे शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळण्यासह इतर अडचणींचा सामना करावा लागतो. अशा प्रकल्पांची विशेष दुरुस्ती व बळकटीकरण करण्यासाठी निधी आवश्यक आहे.
सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी निधी पुरविला जाईल, असे शासनातर्फे सांगितले जात असले तरी मालेगाव तालुक्यातील लघु प्रकल्प दुरुस्ती, बळकटीकरणासाठी निधी मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. निधीअभावी लघु प्रकल्पाच्या दुरुस्तीची कामे रेंगाळली आहेत.