------------
विद्यार्थ्यांना पोषण आहार धान्याचे वितरण
धनज बु. : परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळात शालेय पोषण आहार योजनेंतर्गत उपलब्ध झालेल्या धान्याचे वितरण विद्यार्थ्यांना गुरुवारी करण्यात आले. निर्धारित प्रमाणानुसार तांदूळ, मटकी, मूग डाळ आदी धान्याचे वितरण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थी व पालकांना करण्यात आले.
--------
शिवण बु. येथे ग्रामस्थांना मार्गदर्शन
उंबर्डा बाजार : पाणी फाऊंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी शिवण बु. या गावात जल व मृदसंधारणाची विविध कामे केली जात आहेत. या कामांचे नियोजन करून ती लवकर पूर्ण करण्यासाठी पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक व कृषी विभागाच्या पथकाने शनिवारी ग्रामस्थ व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यापूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनीही येथील ग्रामस्थांना मार्गदर्शन केले होते.
---------
काजळेश्वर-पाणगव्हाण मार्गाची पाहणी
काजळेश्वर उपाध्ये : काजळेश्वर-पाणगव्हाण या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली असून, मोठमोठ्या खड्ड्यांमुळे चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने, या रस्त्याचे काम करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती. यासंदर्भात कारंजा तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी केली.
--------
कामरगावात ९ हजार क्विंटल कापूस खरेदी
कामरगाव : परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी २८ डिसेंबर रोजी कामरगाव येथे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर कापसाची मोठ्या प्रमाणात आवक होत असून, गेल्या २६ दिवसात या केंद्रावर शेतकऱ्यांकडील ९ हजार क्विंटलपेक्षा अधिक कापसाची खरेदी करण्यात आल्याची माहिती ग्रेडर एस. बी. जाजू यांनी शनिवारी दिली.