वाशिम: जिल्ह्यात उभारण्या आलेल्या शासकीय इमारतींचे काम पूर्ण होऊन वर्षभराचा कालावधी उलटत आला असला तरी, या इमारतींचे लोकार्पण अद्यापही झालेले नाही. त्यामुळे इमारती उभारूनही काहीच फायदा झाला नसल्याचे दिसत आहे. यामध्ये सहा महिन्यांपूर्वी उभारणी पूर्ण झालेल्या वाशिम येथील महिला रुग्णालयाचाही समावेश आहे.
जिल्ह्यातील काही शासकीय कार्यालयांच्या जुन्या इमारतीची अवस्था अनेक वर्षांपासून शिकस्त असताना आणि त्या ठिकाणी कामकाजासाठी पुरेशी जागा नसताना शासनाकडे लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर नव्या इमारतींच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली आणि निधीची तरतूद झाल्यानंतर इमारतीचे बांधकामही पूर्ण झाले. त्यामुळे या कार्यालयांचे लोकार्पण होणे अपेक्षीत होते; परंतु त्याला विलंब होत आहे. यामध्ये मालेगाव पंचायत समितीची इमारत, शिरपूर येथील तालुकास्तरीय उपनिंबंधक कार्यालय, तसेच वाशिम येथील जिल्हास्तरीय महिला रुग्णालयाचा समावेश आहे. या तिन्ही इमारतींची उभारणी कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आली आहे. मालेगाव पंचायत समितीची नवी प्रशासकीय इमारत वर्षभरापूर्वी पूर्ण झाली. त्यामुळे ही इमारत त्वरीत ताब्यात घेयाबाबतचा ठरावही पातिर करण्यात आला. चार वर्षांपूर्वी या इमारतीच्या बांधकामाला मंजुरी दिल्यानंतर उभारणीसाठी विलंब लागला आता उभारणी झाल्यानंतर लोकार्पण रखडले आहे. शिरपूर येथे मालेगाव तालुक्याचे निबंधक कार्यालय वर्षभरापूर्वी उभारण्यात आले. या इमारतीमध्ये विज जोडणीसह इतरही सुविधांची उपलब्धता करण्यात आली; परंतु कुंपण भिंतीच्या एका भागाचे काम अर्धवट असल्याने या इमारतीचे लोकार्पण रखडले होते; परंतु आता हे कामही पूर्ण झाल्याची माहिती आहे. दरम्यान, वाशिम येथे गेल्या अनेक वर्षांपासून महिला ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्यात आल्यानंतर गत सहा महिन्यांपूर्वी या इमारतीचे कामही पूर्ण झाले असून. बांधकाम विभागाकडून ही इमारत आरोग्य विभागाच्या ताब्यात देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांशी पत्रव्यवहारही केला आहे; परंतु याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे यांनी मुख्यमंत्र्यांकडेही या संदर्भात पत्रव्यवहार करून महिला ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे लोकापर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना देण्याची मागणी केली होती. आता त्यावर कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती आहे.