पोहा : कारंजा तालुक्यात लोकसंख्येचे मोठे तथा राजकीय आणि शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर असणार्या पोहावासीयांना मागील अनेक वर्षापासून पोलीस चौकीची प्रतीक्षा आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कायद्याचा वचक राहावा यासाठी येथे पोलीस चौकी द्यावी अशी मागणी गावकर्यांनी लावून धरली आहे. येथे शाळा, महाविद्यालय, जिल्हा मध्यवर्ती बँक, सेवा सहकारी सोसायटी, वीज वितरण कंपनीचे उपकेंद्र कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, दूरध्वनी कार्यालय, पोस्ट ऑफिस, नाबार्ड ऑफिस, मेडिकल्स आहेत. या कार्यालयामुळे परिसरातील १५ ते २0 गावांचा या गावाशी दररोजचा संबंध येतो. याशिवाय येथील दुर्गादेवी मंदिर, शिवकालीन पुरातन शिव मंदिर, संत तुकाराम महाराज, अवधूत महाराज मंदिर व जगदंबा देवी मंदिर पंचक्रोशित प्रसिद्ध आहेत. तसेच येथे आठवड्यातील शुक्रवारी आठवडी बाजारही भरतो. या कारणामुळे येथे आठवडाभर गाव तथा परिसरातील शिवनगर, तुळजापूर, बेलमंडळ, पारवाकोहर, उकर्डा, मोर्हळ, चिंचखेड, वढवी, लोहारा, महागाव, लोहगाव, किसाननगर या गावातील नागरिकांची रेलचेल दिसून येते. या वर्दळीचा फायदा काही अपप्रवृत्ती घेत असल्याने दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना गावात घडत आहे. अलीकडच्या काळात चोरी व चिडीमारीच्या घटनेतही वाढ झाली आहे. गावात पोलीस चौकी नसल्याने नागरिक कारंजाला तक्रार द्यायला जात नाही. परिणामी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागल्याने गावाची शांतताभंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुन्हेगारावर कायद्याचा वचक राहावा यासाठी येथे शासनाने पोलीस चौकी द्यावी अशी मागणी गावातील दिलीप दहातोंडे, रामदास मसने, केशव जाधव, गणेश जाधव, हमीद बागवान, पांडूरंग जाधव, सुनील मसने, संजय ढोले, अनिल जाधव, भगवान ढोकणे, छगन टेलर, सतिष निगरूनकर, दिगांबर दहातोंडे व महिला बचत गटाच्या सदस्यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकार्यांना निवेदन देवू, असे गावकर्यांनी सांगितले.
पोहावासीयांना पोलीस चौकीची प्रतीक्षा
By admin | Published: June 16, 2014 12:25 AM