शासनाकडून सर्व शिक्षा अभियानांंतर्गत शाळेतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तसेच आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस प्रत्येकी दोन मोफत गणवेशांचे वाटप करण्यात येतात. या गणवेशाचे अनुदान शाळेच्या खात्यावर जमा केले जाते. या अनुदानातून विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने प्रती विद्यार्थी दोन गणवेश खरेदी करून वितरित केले जातात. या योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात ६२,९०१ विद्यार्थी असून, या सर्वांना प्रत्येकी दोन गणवेश वितरित करण्यासाठी ३ कोटी ७७ लाख ४९ हजार ६०० रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. शिक्षण विभागाने ही मागणी शासनाकडे नोंदविली असून, अद्याप निधी प्राप्त झाला नाही.
-----------
आठवीच्या विद्यार्थ्यांचे सत्र जुन्याच गणवेशावर
शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १५ जुलैपासून आठवी ते १०वीच्या ७३ शाळा सुरू झाल्या आहेत. यातील आठवीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत गणवेश मिळणे अपेक्षित होते, परंतु शासनाकडून निधीच न मिळाल्याने या ७३ शाळांतील हजारो विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशावर शाळेत हजेरी लावावी लागली. दरम्यान, जिल्ह्यात वर्ग आठवीचे २१,५०० विद्यार्थी असून, या सर्वांना गणवेश मिळण्याची प्रतीक्षा आहे.
--------------------
दोन गणवेशांसाठी ६०० रुपयांची मागणी
सर्व शिक्षाअभियानांतर्गत मोफत गणवेश योजनेंतर्गत दोन गणवेशांकरिता प्रति गणवेश २०० रुपयांप्रमाणे ४०० रुपयांचा निधी शासनाकडून देण्यात येतो. त्यात दोन गणवेशांची खरेदी करणे अशक्य आहे. यामुळे अनेकदा शिक्षक, मुख्याध्यापकांना पदरचे पैसे खर्च करून राहिलेल्या विद्यार्थ्यांना गणवेश खरेदी करून द्यावे लागले. यंदाच्या शैक्षणिक सत्रासाठी जि.प. शिक्षण विभागाकडून प्रती गणवेश ३०० रुपयांप्रमाणे दोन गणवेशांसाठी ६०० रुपयांची मागणी नोंदविण्यात आली आहे.
--------------
कोट: सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश योजनेतील पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश वितरित करण्यासाठी ३ कोटी ७७ लाख ४९ हजार ६०० रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. या निधीची मागणी वरिष्ठ स्तरावर नोंदविण्यात आली आहे. निधी प्राप्त होताच, विद्यार्थ्यांना गणवेश वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल.
- गजाननराव डाबेराव, प्रभारी उपशिक्षणाधिकारी (प्राथ),
जि.प. वाशिम
------------
बॉक्स:
१) एकूण पात्र विद्यार्थी -६२,९०१
२) एकूण मागणी -३,७७,४९,६००
बॉक्स: प्रवर्गनिहाय विद्यार्थी व निधीची मागणी
१) सर्व मुली - ३७,०२३
२) एससी मुले - ८,३०१
३) एसटी मुले - ३,५७९
४) बीपीएल मुले - १३,९९८