लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: येथील स्त्री रुग्णालयाचे काम सहा महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले आहे; परंतु अद्यापही त्यावर कुठलीच कारवाई झालेली नाही. या प्रकारामुळे महिला रुग्णांची परवड होत आहे. याबाबत भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून याची दखल घेण्याची मागणी केली आहे.वाशिम येथे स्त्री रुग्णांसाठी १०० खाटांच्या रुग्णालयास मंजुरी मिळाल्यानंतर गेल्या दोन वर्षांपूर्वी या रुग्णालयाच्या इमारतीचे काम सुरू करण्यात आले. सदर इमारतीचे काम सहा महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले असून, अंतर्गत विद्युत जोडणीचे कामही पूर्ण झाले आहे. त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी कार्यकारी अभियंत्यांकडे पत्र पाठवून उपरोक्त माहिती दिली. त्यानुसार कार्यकारी अभियंत्यांनी ३० मार्च २०१७ रोजी पत्र पाठवून स्त्री रुग्णालयाची इमारत योग्य ती कार्यवाही करून घेण्याच्या सूचनाही केल्या; परंतु अद्याप जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय किंवा संबंधित विभागाकडून या संदर्भात कोणतीही कार्यवाही झाले नाही. परिणामी ज्या उद्देशाने या इमारतीची उभारणी करण्यात आली तो उद्देश अपूर्णच असून, स्त्री रुग्णांची हेळसांड कायमच आहे. ही बाब लक्षात घेत भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून सदर प्रकाराची गंभीर दखल घेण्यासह हे रुग्णालय जनसेवेत रुजू करण्याची मागणी केली आहे.
स्त्री रुग्णालयाच्या लोकापर्णाची सहा महिन्यांपासून प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 8:05 PM
वाशिम येथील स्त्री रुग्णालयाचे काम सहा महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले आहे; परंतु अद्यापही त्यावर कुठलीच कारवाई झालेली नाही. या प्रकारामुळे महिला रुग्णांची परवड होत आहे.
ठळक मुद्देप्रशासनाची उदासीनताभाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन