लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पाच वर्षांचा कालावधी संपत आल्याने जिल्ह्यातील २८९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. तत्पूर्वी ग्रामसभेतून वार्ड निश्चिती व आरक्षण सोडत काढण्यात आल्यानंतर अंतिम मुदतीपर्यंत एकूण ८२ हरकती प्राप्त झाल्या आहेत. जिल्ह्यातील २८९ ग्रामपंचायतमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने आतापासूनच राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. वाशिम तालुक्यातील ५२ ग्रामपंचायती, कारंजा तालुक्यातील ५८, मालेगाव तालुक्यातील ४८, रिसोड तालुक्यातील ४५, मानोरा तालुक्यातील ४१ आणि मंगरूळपीर तालुक्यातील ४५ अशा एकूण २८९ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ डिसेंबर २०१७ मध्ये संपणार आहे. आॅक्टोबर किंवा नोव्हेंबर २०१७ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जात असून, तत्पूर्वी वार्ड निश्चिती व आरक्षण सोडत काढण्यात आली. यावर कुणाचा आक्षेप राहू नये म्हणून संबंधित गावातील नागरिकांना हरकती व सूचना नोंदविण्यासाठी ११ जुलै ही अंतिम मुदत दिली होती. अंतिम मुदतीपर्यंत एकूण ८२ हरकती नोंदविण्यात आल्या. यामध्ये मालेगाव तालुक्यातून १९, वाशिम तालुक्यातून २१, रिसोड तालुक्यातून ८, कारंजा तालुक्यातून सहा, मानोरा तालुक्यातून ११, मंगरूळपीर तालुक्यातून १७ अशा हरकतींचा समावेश आहे.राजकारण तापलेग्रामीण भागातील राजकारण ढवळून काढणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. ग्रामीण भागात निवडणूक होत असल्याने ‘राजकारण’ तापले आहे. सत्ताधारी गट हा आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी तर विरोधी गट हा सत्ताधाऱ्यांची सत्ता उलथून टाकण्यासाठी आतापासूनच फिल्डिंग लावत असल्याचे दिसून येते.
वार्ड रचना, आरक्षण सोडतीवर ८२ हरकती प्राप्त!
By admin | Published: July 14, 2017 1:47 AM