लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भारतीय समाजाला प्रबोधन करण्याचे कार्य करणारे राज्यभरातील वारकरी हे राज्यस्तरीय महाअधिवेशनानिमित्त वाशिम येथे ६ जानेवारीला एकवटणार आहे. संत नामदेव, तुकाराम वारकरी परिषदेच्यावतीने या महाअधिवेशनाचे आयोजन केले असून, यामध्ये राज्यातील पाच हजार किर्तनकार, प्रवचनकार, भागवतवाचक व तमाम वारकरी सहभागी होणार आहेत, अशी माहिती वारकरी परिषदेचे वाशिम जिल्हाध्यक्ष ह.भ.प. श्रीकृष्ण पाटील महाराज यांनी बुधवारी दिली.भारतीय समाजाची सद्यस्थिती व भविष्यातील आव्हाने यांच्याशी वारकरी संप्रदायाच्या विचारांची सांगड घालून वारकरी संप्रदायाचा उगम, वाटचाल व सद्यस्थिती यावर सविस्तर चर्चा या महाअधिवेशनात होणार असून सर्वसामान्यांच्या प्रबोधनाच्या दृष्टीने वारकरी संतांना अपेक्षीत अशी भूमिका या महाअधिवेशनात मांडण्यात येणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले (बीड) यांच्या हस्ते होत असून अध्यक्षस्थानी कैकाडी महाराज मठ पंढरपूरचे प्रमुख शि.भ.प. शिवराज महाराज जाधव राहणार आहेत. यावेळी पंढरपूरचे हभप बद्रीनाथ महाराज तनपूरे, जागतिक किर्तीचे मृदंगाचार्य हभप उध्दवबापू महाराज आपेगांवकर, हभप बापूसाहेब महाराज देहूकर, व्यसनमुक्ती सम्राट हभप मधुकर महाराज खोडे, संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष हभप गंगाधर महाराज कुरुंदकर, नांदेडचे हभप मधुकर महाराज बारूळकर, नगरचे हभप अजय महाराज बारसकर आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यकमाच्या आयोजनाची भूमिका गंगाधर बनबरे हे मांडणार आहेत.पहिल्या सत्रात 'वारकरी चळवळीत महिला संतांचे योगदान' या विषयावर हभप प्रतिभा गायकवाड (बीड) व हभप सुनंदा भोस (नगर) आपले विचार मांडतील. अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य महासचिव पूनम पारसकर राहतील. दुसº्या सत्रात 'हिंदवी स्वराज्य निर्मिती शेतकरी व संत तुकाराम' या विषयावर हभप पांडूरंग महाराज शितोळे (आळंदी) यांच्या अध्यक्षतेखाली हभप माऊली महाराज कदम (बीड) व हभप विजय महाराज गवळी (औरंगाबाद) हे मार्गदर्शन करणार आहेत. तिसºया सत्रात ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी गाडगे महाराज यांचे समाजप्रबोधन कार्य’ या विषयावर प्रा. प्रेमकुमार बोके (अंजनगांव सुर्जी) यांच्या अध्यक्षतेखाली हभप डॉ. उद्धवराव महाराज गाडेकर (पाटसूळ -अकोला) व हभप शामसुंदर सोन्नर महाराज (मुंबई) हे आपले विचार प्रकट करणार आहेत. त्यानंतर समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर उपस्थित राहणार असल्याची माहिती हभप श्रीकृष्ण पाटील महाराज यांनी दिली.
राज्यभरातील वारकरी वाशिममध्ये एकवटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 4:02 PM