लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : तालुक्यातील रिधोरा ग्रामपंचायत अंतर्गत १४ व्या वित्त आयोगातून करण्यात आलेले रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार उपसरपंच आणि दोन ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करावे,अन्यथा येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी रस्त्यावरच आत्मदहन करू, असा इशारा मालेगावचे तहसीलदार, गटविकास अधिकारी व ठाणेदारांना निवेदनाद्वारे त्यांनी १७ जानेवारी रोजी दिला आहे. ग्रामपंचायत रिधोरा गोकसावंगी येथे १४ व्या वित्त आयोगातून दोन सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे काम सप्टेंबर २०१८ मध्ये करण्यात आले. सदर रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याने त्यावेळीच उपसरपंच मंदा महादेव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य विलास इंगोले आणि अविनाश वानखडे यांनी गटविकास अधिकाºयांना निवेदन सादर केले आणि या प्रकाराकडे लक्ष वेधले; परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. उलट या रस्त्याचा दर्जा चांगला असल्याचे संबंधित अधिकाºयांनी दर्शवित कामाचे देयक काढण्यास सहकार्य केले. विशेष म्हणजे काम सुरु असताना संबंधित अभियंत्यांनी त्याची एकदाही पाहणी केली नाही. आता तीन महिन्यांच्या कालावधीतच हा रस्ता उखडून खडी व वाळू निघत आहे. त्यामुळे या कामातून शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याचे सिद्ध होत असल्याने या कामाची चौकशी करावी आणि संबंधित दोषी व्यक्तींवर कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे, अशी मागणी उपसरपंच मंदा शिंदे, ग्रामपंचायत सदस्य विलास इंगोले आणि अविनाश वानखडे यांनी केली आहे. याची दखल न घेतल्यास येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी याच निकृष्ट रस्त्यावर आत्मदहन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
रस्त्याच्या चौकशीसाठी उपसरपंचांसह तिघांचा आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 3:10 PM