दत्तात्रय शिंदे
पांगरी नवघरे : येथून जवळच असलेल्या काही गुंडवृत्तीच्या लाेकांनी शेतात जाणारा झोडगा खुर्द ते चिवरा पांदण रस्ता अडविल्याने शेतकऱ्यांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता माेकळा न केल्यास झाेडगा येथील १९ शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन उपाेषणाचा इशारा दिला.
याबाबत या दाेन्ही गावांतील अनेक शेतकऱ्यांनी मालेगाव प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाकडे लेखी तक्रारी दिल्या असून, अद्यापपर्यंत कुठलेही पाऊल संबंधित प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उचलले नाही . ज्या व्यक्तींनी रस्ता अडविला त्यांच्यापैकी काहींवर अनेक गुन्हे दाखल असून, शिक्षासुद्धा भाेगून आल्याचे निवेदनात म्हटले आहे. झोडगा खुर्द येथील १९ शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले असून, लवकरात लवकर अडविलेला रस्ता माेकळा करण्यात यावा नाही तर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच रस्त्याचा प्रश्न कधी सुटणार, असा प्रश्न झोडगा येथील शेतकरी अर्जुना मुठाळ, आनंदा मुठाळ, एकनाथ मुठाळ, मधुकर सरकटे, एकनाथ सुरुशे, भाऊराव सुरुशे, संजय वाघ, विठ्ठल मुठाळ, नारायण सरकटे, बबन सरकटे, अशोक मुठाळ, गणेश मुठाळ, गजानन मुठाळ, ऋषिकेश मोरे, कल्पेश मोरे, प्रभाकर सुरुशे आदी शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनातून केला असून, त्वरित रस्ता न हटविल्यास उपाेषण करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
................
पांगरी जिल्हा परिषद सर्कलमध्ये पांदण रस्त्यांचा तिढा
पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलमध्ये जवळपास सर्वच गावांमध्ये पांदण रस्त्याचा प्रश्न बिकट आहे. परिसरातील सर्व शेतकर्यांच्या वतीने लेखी निवेदन लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, तहसील प्रशासन याकडे वारंवार दिले आहे. आतापर्यंत प्रशासनाच्या वतीने ठोस पाऊल उचलले गेले नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.