लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आगामी खरीप हंगामात जिल्ह्यात १६०० कोटी रुपये पिक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे; मात्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असतानाही कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर प्रशासकीय पातळीवरून अंमलबजावणी ठप्प झाल्याने १३ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. परिणामी, अशा शेतकऱ्यांना आता पीक कर्जापासूनही वंचित राहावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू असून लॉकडाऊनचीही अंमलबजावणी केली जात आहे. असे असले तरी २० एप्रिलपासून शेतीविषयक सर्व कामांना शासनाने यातून सुट दिली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने यंदाच्या खरीप हंगामासाठी १६०० कोटींच्या पिक कर्ज वाटपास हिरवी झेंडी दिली आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा कर्ज घेण्यास पात्र असणाºया शेतकऱ्यांची संख्या अधिक असणार आहे. असे असले तरी मध्यंतरी कोरोना संकटामुळे आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र बंद असल्याने अनेक पात्र शेतकºयांचे अर्ज वेबसाईटवर अपलोड झालेले नाहीत. अशा शेतकºयांच्या सातबारा दस्तावेजावर कर्ज थकीत असल्याचे दिसत असल्याने ते कर्ज मिळण्यापासून वंचित राहण्याची भिती वर्तविण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा शेतकºयांची संख्या १३ हजार आहे.
वाशिम जिल्ह्यात एकूण ८३ हजार ६३४ शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरले होते. त्यापैकी ७६ हजार शेतकºयांचे आधार प्रमाणिकीकरण पूर्ण झाले. त्यातील ६ हजार शेतकºयांच्या अर्जात त्रुटी आढळून ७० हजार शेतकºयांच्या कर्जखात्यात रक्कम जमा झाली; मात्र जवळपास १३ हजार शेतकरी यापासून वंचित राहिले आहेत.- आर.एल. गडेकर, डीडीआर, वाशिम