लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मालेगाव येथील कोरोनाबाधित महिला रुग्णाच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कातील सहा जणांच्या थ्रोट स्वॅब नमुन्यांपैकी पाच अहवाल १९ मे रोजी पॉझिटिव्ह आले होते. यापैकी एका ६५ वर्षीय रुग्णाचा २६ मे रोजी रात्री ११ वाजतादरम्यान मृत्यू झाला असून, उर्वरीत पाच जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना २७ मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुटी देण्यात आली.जिल्ह्यातील मेडशी येथे पहिला कोरोनाबाधीत रुग्ण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळला होता. त्यानंतर उत्तरप्रदेशमधील कोरोनाबाधीत ट्रकच्या क्लिनरचा वाशिममध्ये मृत्यू झाला. त्याच ट्रकचा चालक कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाला होता. मेडशी येथील एक रुग्ण व ट्रक चालकाने कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून यापूर्वीच सुटी देण्यात आली. दरम्यान, मुंबई येथून परतत असताना, १५ मे रोजी मालेगाव येथील एक महिला कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. या महिलेच्या संपर्कातील सहा जणांपैकी पाच जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे १९ मे रोजी अहवालावरून स्पष्ट झाले होते. या सहा जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू होते. दरम्यान, ६५ वर्षीय एका रुग्णाला मधुमेह हा अतिजोखमीचा आजार होता. सदर रुग्णाला गेल्या चार दिवसांपासून कृत्रिमरित्या आॅक्सिजन देवून डॉक्टरांचे पथक उपचार करीत होते. मात्र, २६ मे रोजी त्याची प्रकृती बिघडली, दुर्दैवाने २६ मेच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी दिली. दरम्यान, अन्य पाच जणांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना २७ मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुटी देण्यात आली.दरम्यान, आतापर्यंत एकूण १८४ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर १५५ अहवाल निगेटिव्ह आले. २१ अहवाल प्रलंबित आहेत. २७ मे रोजी एकूण १८ अहवाल निगेटिव्ह आले. आठ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी दोन मृत्यू तर उर्वरीत सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुटी देण्यात आली. ‘रेड झोन’मधून येणाºया मजूर, कामगारांवर विशेष लक्ष ठेवले जात असून, सर्दी, खोकला किंवा ताप आदी लक्षणे असणाºयांना कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. चिखली येथील तीन अहवाल प्रतिक्षेतसांगवी (ता. जिंतूर, जि.परभणी) येथील कोरोनाबाधित मृत महिलेच्या अंत्यसंस्काराला चिखली (ता.रिसोड) येथील तीनजण गेले होते. त्यांचे ‘थ्रोट स्वॅब’ २६ मे रोजी पाठविले. अद्याप त्याचा अहवाल प्राप्त झाला नाही.