- संतोष वानखडेवाशिम - प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना (ग्रामीण) व शबरी आवास योजना (ग्रामीण) अशा तिन्ही योजनेंतर्गत एकूण ७८०४ घरकुलांची कामे अपूर्ण असून, ही कामे पूर्ण करण्यासाठी २५ फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहिम राबविण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी सहाही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांना गुरूवारी दिले. यावरून अपूर्ण घरकुलप्रकरणी सीईओ ‘अॅक्शन मोड’वर आल्याचे मानले जात आहे.
‘सर्वांसाठी घरे २०२४’ हे राज्य शासनाचे धोरण असून, त्यानुसार बेघर व कच्च्या घरात वास्तव्य करणाऱ्या पात्र लाभार्थींना सन २०२४ पर्यंत स्वत:चे हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाच्या विविध घरकुल योजनेतून प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) सन २०१६-१७ ते २०२१-२२ अंतर्गत एकूण उद्दिष्टानुसार १८३५२ पैकी १८३५२ घरकुले मंजूर करण्यात आली. त्यापैकी एकूण २६४७ घरकुले अपूर्ण आहेत. ही घरकुले या विशेष मोहिमेअंतर्गत पूर्ण करावयाची आहेत. याचप्रमाणे रमाई आवास योजनांतर्गत ३९६९ घरकुले तर शबरी आवास योजनेंतर्गत ११८८ घरकूले पूर्ण करावयाची आहेत.
मोहिमेकडे दूर्लक्ष केल्यास गय नाही : सीईओ वाघमारेग्रामीण भागातील विविध घरकुल योजनेच्या उद्दिष्टांप्रमाणे प्रस्ताव मंजूर करणे, प्रलंबित हप्ते तात्काळ वितरीत करणे, अपूर्ण घरकुले पूर्ण करणे तसेच मोदी आवास घरकुल योजना, रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजने व अन्य आवास योजनांच्या यशस्वीतेकरीता २५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत विशेष मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेकडे दुर्लक्ष करणाऱ्या तसेच कर्तव्यात कसुर करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे सांगतानाच संबंधितांवर प्रशासकीय कार्यवाही करण्याचा सूचक इशारा सीईओ वैभव वाघमारे यांनी दिला.