वाशिम : गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुन्हा एकदा विशेष कुटुंब संपर्क अभियान हाती घेतले असून, शौचालय बांधकामाची उद्दिष्टपूर्ती न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला.
जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे १५ नोव्हेंबरपर्यंत विशेष कुटुंब संपर्क अभियान राबविले होते. आता पुन्हा कुटुंब संपर्क अभियान हाती घेऊन गावोगावी जनजागृतीला सुरूवात करण्यात आली. जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सामुहिक माध्यमातून गावोगावी भेटी देऊन शौचालय नसलेल्या कुटुंबियांशी संवाद साधणे आणि शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन करणे, असा उपक्रमाचा उद्देश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांच्या चमूने रिसोड तालुक्यातील केशवनगर व अन्य गावांना भेटी देऊन गावकºयांशी संवाद साधला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनीस यांनी मानोरा तालुक्यातील गावांना भेटी देऊन शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांनी मंगरूळपीर तालुक्यातील गावांना भेटी देऊन जनजागृती केली. उघड्यावरील शौचास जाण्याचे दुष्परिणाम निदर्शनात आणून दिले. गावकºयांच्या अडचणी जाणून घेतल्या. गाव स्वच्छ व सुंदर तसेच हगणदरीमुक्त बनविण्यासाठी गावकºयांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी केले.