वाशिम: अंगणवाडी सेविका, मदतनीसांसह इतर कर्मचारी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी एकवटले असून, शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर १७ जानेवारी रोजी राज्यव्यापी संप करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने (आयटक) दिला आहे. संघटनेच्या वाशिम जिल्हा शाखेकडून या संदर्भात जिल्हाधिकाºयांकडे निवेदनही सादर करण्यात आले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली, केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी १७ आॅगस्ट २०१६ रोजी देशभरातील अंगणवाडी कर्मचाºयांना ३५० रुपये प्रति दिवस वेतन, भविष्य निर्वाह निधी, इएसआय व सामाजिक सुरक्षा लागू करण्याचे जाहीर केले; परंतु अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ आॅक्टोबर २०१७ रोजी अंगणवाडी कर्मचाºयांना सेवा ज्येष्ठतेनुसार मानधन वाढ करण्याचे जाहीर केले. त्या आदेशाचीही अंमलबजावणी झालेली नाही. त्याशिवाय जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाºयांना पीएफएमएस प्रणालीद्वारे मानधन देण्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे मानधन वेळेवर मिळण्याची अपेक्षा होती; परंतु परिस्थिती अगदी त्या उलट आहे. या बाबींचा विचार करून शासनाने उपरोक्त निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करून अंगणवाडी सेविकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आयटकच्यावतीने करण्यात आली आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १७ जानेवारी रोजी एक दिवसीय संप करण्याचा निर्णय आयटकने घेतला आहे. त्यानुसार आयटकच्या वाशिम जिल्हाध्यक्ष सविता इंगळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय संप व धरणे आंदोलन करणार आहेत.