वाशिम (संतोष वानखडे): कारंजा तालुक्यातील काजळेश्वर, धनज, वाई व किन्ही रोकडे या चार ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल १९ सप्टेंबर रोजी जाहिर झाला असून, चारही ग्रामपंचायतीत मतदारांनी प्रस्थापितांचा पराभव करीत नव्या उमेदवारांना संधी दिली. उपरोक्त चार गावातील ९११५ मतदारांपैकी ६८०७ म्हणजेच ७४.६८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
काजळेश्वर येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस समर्थीत पॅनल विजयी झाले. धनज, किन्ही रोकडे व वाई येथे स्थानिक पॅनलने बाजी मारली. धनज येथे सरपंच पदासाठी मिलिंद मुंदे यांनी दिग्गज उमेदवार परवीन जिकर मोटलानी यांचा ४४४ मतांनी पराभव केला. काजळेश्वर ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदासाठीनितीन विष्णु उपाध्ये यांनी उमेश जग्गनाथ उपाध्ये यांना पराभुत करून बाजी मारली. किन्ही रोकडे मध्ये सरपंच पदासाठी मिना मनोज रोकडे यांनी प्रतिस्पर्धी रत्नाबाई लक्ष्मण कवळे यांचा पराभव केला तर वाइ येथे सरपंच पदासाठी अमोल अशोकराव ठाकरे यांनी ओमप्रकाश हरीकीशन तापडीया यांचा पराभव केला.
इश्वरचिठ्ठीने सै. सादीक सै. अमानुल्ला विजयी
किन्ही रोकडे ग्राम पंचायत मध्ये प्रभाग क्र. ३ मध्ये सैयद सादीक सैयद अमानुल्ला व शेख सैयद इमरान शेख अकील यांना प्रत्येकी ८३ मते मिळाल्याने ईश्वर चिट्ठी काढण्यात आली. त्यानुसार सैयद सादीक सैयद अमानुल्ला विजयी ठरले.