वाशिम, दि. १९-स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील १७ निर्वाचित संचालकांनी कलम ४५ ची अपात्रता धारण केल्याने त्यांना पदावरुन कमी करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक डी.आर. खाडे यांनी १६ जानेवारी रोजी दिले. दरम्यान, या आदेशास संबंधित संचालकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले. त्यावर खंडपीठाने संचालक अपात्रतेच्या कारवाईस गुरुवार, १९ जानेवारीला स्थगिती दिली.बाजार समितीचे आडते गिरधर सारडा यांनी ५२ आडते व खरेदीदार यांच्यासह गोडाउनची मागणी करूनही बाजार समितीने गोडाउन न दिल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधकाकडे केली होती, तसेच तज्ज्ञ संचालक बंडू विठ्ठल महाले व आनंद तुळशिराम मालपाणी यांनी विविध कामांची चौकशी करण्याबाबत उपनिबंधकांकडे तक्रार दाखल केली होती. दरम्यान, कृषी पणन मंडळाच्या संचालकांनी वाशिम बाजार समितीची चौकशी करून कारवाईच्या सूचना उपनिबंधकांना दिल्या होत्या. एकूणच या सर्व बाबींवरून बाजार समिती संचालक मंडळाने कलम १२ (१) चे उल्लंघन केले, तसेच बाजार समितीचे आर्थिक नुकसान केल्याची खात्री झाल्यामुळे जिल्हा उपनिबंधक खाडे यांनी, कृषी उत्पन्न बाजार समितीतील निर्वाचित १७ संचालकांना अपात्र ठरविण्याचा आदेश १६ जानेवारी रोजी दिला होता. त्यास विरोध दर्शवित संबंधित संचालकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात स्वतंत्र याचिका दाखल केली. त्यानुसार, न्यायालयाने आदेशास स्थगिती दिली.
वाशिम बाजार समिती संचालक अपात्रतेस स्थगिती!
By admin | Published: January 20, 2017 2:15 AM