- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील ब्राम्हणवाडा (ता. मालेगाव) येथून जवळच असलेल्या मारसूळ येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या विविध कामांमध्ये ६९ लाखांपेक्षा अधिक रकमेचा अपहार झाला. याप्रकरणी विशेष पथकांमार्फत करण्यात आलेल्या चौकशीअंती तब्बल २ वर्षांनंतर तीन तत्कालिन गटविकास अधिकाऱ्यांसह १४ जणांवर ३१ डिसेंबर २०२० रोजी मालेगाव पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले; मात्र ८ दिवस उलटूनही सर्वच आरोपी अद्याप फरार असून दोन आरोपी बीडीओंनी अटकपूर्व जामीन मिळविण्याकरिता धडपड चालविल्याची माहिती आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मारसूळ येथे २०१७-१८ मध्ये ८१ व २०१८-१९ मध्ये १९ अशी १०० कामे करण्यात आली. त्यात वैयक्तिक शौचालय, शेततळे, शोषखड्डा, सार्वजनिक वृक्षलागवड, नाला सरळीकरण, खोलीकरण अशा प्रकारच्या कामांचा समावेश होता. या कामांमध्ये आरोपींनी शासनाची दिशाभूल करून ६९ लाखांपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याचे चौकशीअंती सिद्ध झाले. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून मालेगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी माधव साखरे यांनी ३१ डिसेंबर रोजी मालेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून तत्कालिन गटविकास अधिकारी संदीप रामचंद्र कोटकर, कुलदीप कालीदास कांबळे, संजय नामदेव महागावकर, कनिष्ठ अभियंता कैलास नारायण मगर, तांत्रिक कंत्राटी अधिकारी पवन उमेश भुते, सहायक लेखा अधिकारी सुभाष मोतीराम इंगळे, सहायक कार्यक्रम अधिकारी योगेश्वर श्रीकिसन तागतोडे, संगणक परिचालक विनोद संभाजी आगाशे, सागर गजानन इंगोले, ग्रामसेवक संतोष मदन खुळे, ग्रामसेविका सोनल बळीराम इंगळे, नीलेश काशीराम ढंगारे, रोजगारसेवक शत्रुघ्न लोडजी खिल्लारे आणि ब्राम्हणवाडाचे सरपंच पंजाबराव घुगे अशा १४ जणांवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
आरोपीच्या शोधात विशेष पथक रवाना८ दिवसांपूर्वी गुन्हे दाखल होऊनही याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही; तर कुलदीपक कालीदास कांबळे आणि संजय नामदेव महागावकर या तत्कालिन गटविकास अधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली असून, संदीप रामचंद्र कोटकर यांच्या शोधात पोलिसांचे विशेष पथक रवाना करण्यात आले आहे, अशी माहिती मालेगावचे ठाणेदार आधारसिंग सोनोने यांनी दिली.