- संतोष वानखडेवाशिम - मागील २४ तासांत जिल्ह्यात संततधार पाऊस झाला असून, कारंजा तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. बेंबळा नदीचे पाणी लाडेगावात तर कमळगंगा धरणाचे पाणी हिवरालाहे गावात शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. लाडेगावात जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे प्रयत्न ग्रामस्थांकडून सुरू आहेत.
कारंजा तालुक्यातील हिवरालाहे येथील कमळगंगा धरण ओव्हर फ्लो झाल्याने त्यातील पाण्याचा विसर्ग लगतच्या नाल्यात झाला आणि त्या नाल्याला आलेल्या पुराचे पाणी २२ जुलैला हिवरालाहे गावात नाल्यालगतच्या भागात शिरले. त्यामुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती देण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाहणी करण्यात येणार आहे.बेंबळा नदीचे पाणी लाडेगावात शिरले. यामुळे जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी गावकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे शनिवारी दुपारी दिसून आले. नागपुर हायवे रस्त्यावरील खेर्डा कारंजा गावानजीक असणा-या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. होता.
आखतवाडा, धनज, लाडेगाव, हिवरा लाहे, किनखेड, धानोरा ताथोड, ब्राम्हणवाडा, शेमलाई, झोडगा, बेंबळा, पिंप्री मोखड, औरंगपुर या गावासह शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे पिंप्री मोखड गावातील आश्रम शाळेतील विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. तसेच हिंगणवाडी, अंबोडा, रामटेक, राहटी या गावाच्या चारही बाजुने बेंबळा नदी गेल्यामुळे गावाला पाण्याने वडा घेतला असून शहराशी गावाचा संपर्क तुटला. या पाण्यामुळे तालुक्यातील जवळपास तीन हजार हेक्टर जमिन पाण्याखाली गेल्याचा अदांज कृषी विभागाकडून विर्तविला जात आहे. परिस्थिती लक्षात घेता कारंजाचे तहसिलदार कुणाल झाल्टे व तालुका कृषी अधिकारी रवि जटाले, मंडळ कृषी अधिकारी, तलाठी, कृषी सहायक यांच्या चमूने नदीकाठच्या गावांना भेटी देउन गावक-यांना धिर दिला. मानोरा तालुक्यातील फुलउमरी, पोहारादेवी परिसरातही नदीनाल्याला पूर आल्याने नदीकाठच्या शेतात पाणी साचले.