वाशिम: बसस्थानकापासून १०० मीटर अंतराच्या आत वाहनतळाशिवाय इतर ठिकाणी वाहनास प्रवेशच निषिद्ध आहे; परंतु वाशिम येथील बसस्थानकात मात्र या आचारसंहितेचे उल्लंघन करून थेट बसस्थानक इमारतीत फलाटापर्यंत काही महाभाग आपल्या दुचाकी सुरक्षीतपणे उभ्या ठेवत असल्याचे दिसत आहे. या प्रकाराकडे वाशिमच्या आगार प्रमुखांचे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. बसस्थानकावरील वाहनतळ सोडून कुठल्याही बसस्थानक परिसरात १०० मीटर अंतरापर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) वाहनाशिवाय इतर कुठलेही वाहन उभे ठेवण्याची परवानगी नाही. ते नियमांचे उल्लंघन असल्याने बसस्थानक प्रमुखच परिसरात उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाईसुद्धा करू शकतात. तथापि, वाशिम येथील बसस्थानकावर मात्र याची दखल घेतल्या जात नसल्याचे दिसत आहे. वाशिम येथील बसस्थानक इमारतीच्या दोन्ही बाजुला अगदी फलाटापर्यंत अनेक दुचाकी उभ्या ठेवण्यात आल्याचे दिसून येते. इमारतीच्या प्रवेशद्वारापासून अगदी फलाटापर्यंत वाहने उभी करण्यात येत असल्याने वाहने सुरक्षीत राहतात; परंतु प्रवाशांना मात्र बसस्थानकात प्रवेश करतानाही अडचण येते. या प्रकाराकडे आगार आणि बसस्थानक प्रमुखांचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्यानेच दुचाकीधारक आपली दुचाकी येथे कित्येक तास उभी ठेवतात. प्रत्यक्षात वाशिम येथील बसस्थानकावर वाहनतळ असून, येथे दुचाकी उभ्या ठेवण्याची व्यवस्थाही आहे; परंतु त्याची दखल घेण्यात येत नसल्याचे दिसते.
बसस्थानक इमारतीच्या छताखाली दुचाकी उभ्या ठेवण्यास परवानगी नाही. एखादवेळी हा प्रकार घडला असेल. तथापि, प्रवाशांना होत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन इमारतीच्या आत प्रवेश करणाºया वाहनांसह परिसरात ठेवल्या खाजगी वाहनांवर नियमानुसार तातडीने कार्यवाही करण्यात येईल.-व्ही. एम. इलमे, आगार व्यवस्थापक, वाशिम