लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘तो’ आणि ‘ती’ जन्मत: अंध असूनही संगीत विषारद आहेत. नेत्रहिन आहोत म्हणून कुढत बसण्यापेक्षा परिस्थितीचा धैर्याने सामना करीत त्यांनी आनंदाने तद्वतच समर्थपणे जीवन जगण्याची कला आत्मसात केली. अशा प्रवीण आणि अलका या दोन्ही डोळ्यांनी अंध असणा-या युवक, युवतीचा ४ मार्चला केकतउमरा येथील चेतन निवास येथे उत्साहाच्या वातावरणात विवाह पार पडला. समाजातील काही दाते आणि अंध बांधव दिव्यांग विकास फाउंडेशनच्या पुढाकाराने पार पडलेल्या या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे साक्षीदार झाले.संगीतात पारंगत असलेल्या प्रवीणचे आडनाव कठाळे आहे; परंतु त्यास नेत्रदान चळवळीचा ‘ब्रॅन्ड अॅम्बेसिडर’ असलेल्या चेतन उचितकरचे वडील पांडुरंग उचितकर यांनी मानसपुत्र मानून त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. एवढेच नव्हे; तर त्याचा विवाह जुळवून आणण्यासाठी पुढाकार घेतला. दरम्यान, वनिता दिगांबर पहुरकर यांच्या प्रयत्नाने ब्राम्हणगाव (ता.उमरखेड) येथील सुनंदा आणि अशोकराव विनकरे यांची नेत्रहिन मुलगी अलका हिच्याशी प्रवीणचा विवाह ठरला. तो ४ मार्च रोजी केकतउमरा येथील चेतन निवास येथे उत्साहाच्या वातावरणात पार पडला. या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे वाशिम परिसरात कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)
अकोला येथे स्वागत समारंभ!प्रवीण आणि अलका हे नेत्रहिन दाम्पत्य विवाह बंधनात अडकले असून, त्यांच्या स्वागत समारंभाची जबाबदारी डॉ. उत्पला आणि डॉ. प्रशांत मुळावकर यांनी स्वीकारली आहे. येत्या ६ मार्चला अकोला येथे हा कार्यक्रम होत आहे.
लोकमतप्रेरणावाट